इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताने दहा गडी राखून विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दुसऱ्याच दिवशी पाहुण्यांचा पराभव झाला. पहिल्या डावात इंग्लंडने ११२ तर भारताने १४५ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडचा डाव ८१ धावांत आटोपला आणि भारताला ४९ धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान सलामीवीर रोहित शर्मा (२५*) आणि शुबमन गिल (१५) यांनी सहज पूर्ण केले. भारती संघाने दोन दिवसात कसोटी सामना जिंकला. त्यामुळे अनेक चाहते आनंदी झाले. पण काही चाहते आणि इंग्लंडचे माजी खेळाडू यांनी मात्र खेळपट्टीच्या स्तरावर प्रश्न उपस्थित केले.  भारताचा माजी खेळाडू युवराज सिंग यानेही अप्रत्यक्षपणे अहमदाबाद येथील खेळपट्टीवर प्रश्न उपस्थित केला आहे.

काय म्हणाला युवराज ?
अवघ्या दोन दिवसांमध्ये सामना संपला, कसोटी क्रिकेटसाठी हे चांगलं आहे का? माहित नाही. जर कुंबळे आणि हरभजन यांनी अशा खेळपट्टीवर गोलंदाजी केली असती तर ८०० ते १००० विकेट घेतल्या असत्या. भारतीय संघाला विजयाच्या शुभेच्छा… अक्षर पटेलनं उत्कृष्ट गोलंदाजी केली. अश्विन आणि इशांत शर्मालाही शुभेच्छा!

लक्ष्मण आणि भज्जीनंही उपस्थित केला प्रश्न –
फक्त युवराजच नव्हे तर भारताचा माजी खेळाडू व्ही व्ही एस लक्ष्मण आणि हरभजन सिंग यांनीही खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. समालोजन करताना लक्ष्मण म्हणाला की, ‘कसोटी सामन्याची ही उत्कृष्ट खेळपट्टी नक्कीच नाही. नव्या चेंडूनं फिरकी गोलंदाज भारतामध्ये खूप कमी गोलंदाजी करतात. भारतातील खेळपट्टीवर तिसऱ्या दिवसांपासून चेंडू स्विंग होतो. या खेळपट्टीवर फंलदाजीची विशेष शैलीही हवी. ती कोणत्याच फलंदाजात दिसली नाही.’ भज्जी म्हणाला की, दोन्ही संघासाठी खेळपट्टी सारखीच होती. पण दोन दिवसांत कसोटी सामना संपणं योग्य नाही. इतकं मोठं स्टेडिअम तयार करण्यात आलं अन् खेळपट्टी खराब… फक्त पाच सत्रात ३० विकेट गेल्या आहेत. हे चुकीचं आहे. दोन दिवसांत सामना संपतो म्हणजेच काहीतर अडचण नक्कीच आहे.


विराट काय म्हणाला?
सामन्यानंतर बोलताना भारतीय कर्णधार विराट कोहली म्हणाला की, ‘खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक होती. चेंडू बॅटवर व्यवस्थित येत होता. विशेषकरुन पहिल्या डावांत.आम्ही तीन गड्यांच्या मोबदल्यात ९९ धावा काढल्या होत्या. मात्र, त्यानंतर फलंदाजी ढेपाळली. भारतीय संघ १४५ धावांत गारद झाला. आम्ही आणखी धावा काढू शकलो असतो.’ खेळपट्टीवर चेंडूला अतिरिक्त स्विंग मिळत असल्याच्या चर्चेवर विराट कोहलीनं सहमती दर्शवली नाही. तो म्हणाला, ‘हे विशेष आहे की, सामन्यात पडलेल्या तीन विकेटपैकी २१ विकेट सरळ चेंडूवर पडल्या आहेत. म्हणजेच चेंडूला जास्त स्विंग किंवा टर्न मिळत नव्हता. कसोटीत बचावात्मक फलंदाजीवर विश्वास ठेवावा लागतो.’ विराट कोहली फलंदाजांनी केलेल्या खराब कामगिरीवर नाराज होता. तो म्हणाला की, ‘फलंदाजांनी खेळपट्टीवर संयम दाखवला नाही, त्यामुळेच सामना दोन दिवसात संपुष्टात आला.’