एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये सुरु आहे. या स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड या सामन्यात एक अफलातून किस्सा घडला. सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर आलेल्या पाकिस्तानच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. पण पहिल्या डावात ख्रिस वोक्स याने टिपलेल्या अफलातून झेलची सर्वत्र चर्चा झाली.

पाकिस्तानचा डावखुरा फलंदाज इमाम उल हक याने दमदार फलंदाजी करत ५८ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार यांच्या साहाय्याने ४४ धावा केल्या होत्या. फिरकीपटू मोईन अली याच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार खेचावा आणि दिमाखात अर्धशतक साजरे करावे विचाराने इमामने उंच फटका खेळला, हा फटका अंदाजापेक्षा कमी पडला. महत्वाचे म्हणजे हा चेंडू चौकार जाणे शक्य होते, पण वोक्सने धावत जाऊन हवेतच चेंडू झेलला. त्यामुळे इमामला ४४ धावांवर माघारी परतावे लागले.

हा पहा व्हिडीओ –

दरम्यान, पाकिस्तानकडून खेळताना इमामसह फखर झमानने अर्धशतकी सलामी दिली. त्याने ३६ धावा केल्या. या खेळीत त्याने ६ चौकार लगावले. मोईन अलीने त्याचा काटा काढला. यष्टीरक्षक बटलर याने त्याला चपळाईने यष्टिचीत केले. त्यानंतर आलेल्या बाबर आझमने अर्धशतक झळकावले. त्याने ६६ चेंडूत ६३ धावा केल्या. या खेळीत त्याने ४ चौकार आणि १ षटकार लगावला. पाठोपाठ मोहम्मद हाफिझनेही इतर फलंदाजांच्या साथीने चांगली खेळी करत पाकिस्तानला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली.