लंडन : इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयला मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे तीन सामन्यांना मुकावे लागले होते. मात्र त्याच्या दुखापतीत सुधारणा होत असून तो भारताविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी उपलब्ध असेल, अशी आशा यजमान इंग्लंडला वाटत आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याला अफगाणिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांना मुकावे लागले होते. त्याच्या अनुपस्थितीत इंग्लंडला श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. आता उपांत्य फेरीत मजल मारण्यासाठी इंग्लंडला भारत आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांपैकी एका सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य आहे.

‘‘जेसन रॉयच्या दुखापतीत सुधारणा होत आहे. प्रत्येक दिवशी त्याच्या दुखापतीची चाचपणी केली जात आहे. बुधवारी त्याने नेटमध्ये फलंदाजीचा सराव केला. शुक्रवारी आणि शनिवारी आमचे सराव सत्र होणार आहे, त्यावेळी त्याच्या तंदुरुस्तीची पाहणी केल्यानंतरच भारताविरुद्धच्या सामन्यासाठी रॉयची निवड केली जाईल,’’ असे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या पत्रकात म्हटले आहे. रॉयने चार सामन्यांमध्ये ७१.६६च्या सरासरीने २१५ धावा केल्या आहेत. त्याच्या जागी संधी मिळालेल्या जेम्स विन्सला (२६, १४, ०) तिन्ही सामन्यांमध्ये चमक दाखवता आली नाही.