तुषार वैती

वेस्ट इंडिजचा संघ काहीही करू शकतो, हे १९७५ आणि १९७९च्या विश्वचषक विजेतेपदाने तसेच २०१२ आणि २०१६च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक विजयाने अधोरेखित झाले. क्लाइव्ह लॉइडच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिज संघाने पहिल्या दोन विश्वचषकांवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. १९८३ मध्ये वेस्ट इंडिजची विश्वविजयी बुलेट ट्रेन भारताने रोखल्यानंतर कॅरेबियन क्रिकेटला मात्र उतरती कळा लागली. त्यानंतर २०१५च्या उपांत्यपूर्व फेरीचा अपवाद वगळता वेस्ट इंडिजचा संघ केवळ विश्वचषकात सहभागापुरताच मर्यादित राहिला.

१९७५च्या विश्वचषकात लाइड यांच्यासह अल्विन कालिचरण, सर व्हिव्हियन रिचर्ड्स, गॉर्डन ग्रिनिज, रोशन कन्हाय, अँडी रॉबर्ट्स तर १९७९च्या विश्वचषकात लॉइड, रिचर्ड्स, कालिचरण, ग्रिनिज यांच्यासह मायकेल होल्डिंग, माल्कम मार्शल, जोएल गार्नर, लॅरी गोम्स, डेस्मंड हेन्स, कॉलिस किंग असे मातब्बर खेळाडू वेस्ट इंडिज संघात होते. देदीप्यमान खेळाडूंची परंपरा वेस्ट इंडिजला नंतर जपता आली नाही. अलीकडच्या काळात वेस्ट इंडिजला तारणारी ब्रायन लारा, कार्ल हूपर, कर्टनी वॉल्श, कर्टली अ‍ॅम्ब्रोज, ख्रिस गेल, शिवनारायण चंदरपॉल अशी मोजकीच नावे घेता येतील.

क्रिकेटमध्ये महासत्ता होऊ पाहणाऱ्या वेस्ट इंडिजची गेल्या दोन दशकांत वाताहत होत गेली. मद्यधुंद वातावरणात क्रिकेटचा आनंद लुटणे, संगीताची मेजवानी, वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाला लागलेली घरघर आणि आर्थिक विवंचनेत सापडलेले खेळाडू यामुळे कॅरेबियन क्रिकेटची पुरती दैना झाली. त्यात वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी पैसे कमावण्यासाठी जगभरातील क्रिकेट लीगना पसंती दिल्यामुळे याच प्रकारात त्यांचे खेळाडू माहीर होत गेले. त्यामुळेच २०१२ आणि २०१६च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकांमध्ये विंडीजचा दबदबा पाहायला मिळाला.

वेस्ट इंडिजचे खेळाडू ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याच्या तयारीत नसले तरी एकदिवसीय क्रिकेटमध्येही हा संघ काहीही करू शकतो, याचे उदाहरण न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पाहायला मिळाले. ज्या न्यूझीलंडविरुद्ध भारताचे सव्वाशेर सपेशल अपयशी ठरले, त्याच माऱ्यासमोर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी ४००पेक्षा अधिक धावांचा डोंगर उभा केला. विशेष म्हणजे, यंदाची ‘आयपीएल’ स्पर्धा गाजवली ती फक्त आणि फक्त वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी. यापैकीच काही खेळाडूंनी वेस्ट इंडिजच्या संघात स्थान मिळवले आहे. जर ‘आयपीएल’मध्येच चमकलेल्या खेळाडूंचा विंडीज संघ निवडण्यात आला असता तर कोणत्याही संघाची डाळ त्यांच्यासमोर शिजली नसती, अशीच भावना सर्वाच्या मनात असेल.

गेल्या वर्षी विश्वचषकासाठी थेट प्रवेश न मिळता पात्रता फेरीतून झगडत इंग्लंडमध्ये दाखल झालेला वेस्ट इंडिजचा संघ सर्वात धोकादायक वाटत आहे. विंडीजची संपूर्ण मदार ही त्यांच्या फलंदाजीवर आहे. ख्रिस गेल, एविन लुइस, शाय होप, डॅरेन ब्राव्हो, शिम्रॉन हेटमायर, जेसन होल्डर, आंद्रे रसेल, कालरेस ब्रेथवेट, निकोलस पूरन, अ‍ॅशले नर्स असे १० फलंदाज जगातील कोणत्याही गोलंदाजीवर हुकमत गाजवू शकतात. कोणत्याही स्थितीत एकहाती सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असलेले गेल आणि रसेल हे धोकादायक फलंदाज सध्या तुफान लयीत आहेत. एकटय़ा रसेलने यंदाच्या आयपीएलमध्ये ५२ षटकारांची आतषबाजी केली होती. त्यांच्या जोडीला जर ड्वेन ब्राव्हो आणि किरॉन पोलार्ड यांना विंडीज संघात स्थान देण्यात आले असते तर भल्या भल्या गोलंदाजांची पळता भुई थोडी झाली असती. रसेलसह ओशाने थॉमस आणि श्ॉनन गॅब्रियल हे वेगवान गोलंदाजीची धुरा वाहण्यासाठी सज्ज झाले आहेत. आता वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाच्या प्रशासनामध्ये झालेली उलथापालथ आणि गेल, रसेलसारख्या अनुभवी खेळाडूंचे संघात झालेले पुनरागमन यामुळे वेस्ट इंडिज क्रिकेटला नवी झळाळी मिळेल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.