करोना विषाणूमुळे आयपीएलचा १४वा हंगाम पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे टीम इंडियाचे खेळाडू आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज झाले आहेत. तर काही खेळाडू आगामी काळातील योजनांचा विचार करत आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने आता नव्या क्षेत्रात उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

कार्तिक इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या लीग ‘द हंड्रेड’ मध्ये समालोचकाच्या भूमिकेत असेल. अधिकृत भागीदार स्काय स्पोर्ट्सने ‘द हंड्रेड’साठी समालोचकांचे पथक जाहीर केले आहे. कार्तिक व्यतिरिक्त अँड्र्यू फ्लिंटॉफ, स्टुअर्ट ब्रॉड, केव्हिन पीटरसन, कुमार संगकारा हे देखील या पॅनेलमध्ये समाविष्ट आहेत. २१ जुलैपासून या लीगला सुरुवात होईल.

 

फ्लिंटॉफ, कॅस नैडू, जैनब अब्बास, जॅकलिन यांना थेट प्रक्षेपणात प्रेझेंटेटर म्हणून ठेवण्यात आले आहे. यात कार्तिक, ब्रॉड, केव्हिन पीटरसन, टॅमी ब्यूमॉन्ट, डॅरेन सॅमी, मेल जोन्स, वसीम अक्रम, ग्रीनवे आणि कुमार संगकारा असतील.

आयपीएल २०२१ स्थगित

भारतात करोनाची दुसरी लाट कायम आहे. दरम्यान, आयपीएल २०२१ बंद दरवाजांच्या मागे खेळवण्यात येत होते. २९ सामने खेळवले गेल्यानंतर करोनाने बायो बबलमध्ये एन्ट्री घेतली. कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर संक्रमित आढळले. चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाजी प्रशिक्षक बालाजी संक्रमित असल्याचे आढळले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी दिल्ली कॅपिटल्स संघाचे दोन खेळाडू अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैदराबादच्या वृद्धिमान साहा यांना संसर्ग झाल्याचे आढळले.