आयपीएलमध्ये दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाकडून खेळत असलेला ऋषभ पंत त्याच्या कामगिरीमुळे सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. भारताच्या U-19 संघातील आणि रणजी क्रिकेटमधील त्याची कामगिरी नक्कीच वाखाणण्याजोगी होती. प्रचंड क्षमता असलेल्या भारतातील उदयोन्मुख खेळाडूंपैकी एक म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. या सगळ्यामुळे साहजिकच क्रिकेट रसिकांमध्ये ऋषभचे खासगी जीवन आणि आतापर्यंतच्या प्रवासाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

मात्र, या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऋषभने अनेक अडीअडचणींचा सामना करत बिकट परिस्थितीतून वाट काढली आहे. ऋषभ हा सुरूवातीच्या काळात रुरकी येथे राहत होता. एक दिवस दिल्लीच्या सोनेट क्लबचे प्रशिक्षक तारक सिन्हा यांनी एका शिबिरात ऋषभ पंतमधील गुणवत्ता हेरली. त्यांच्या सांगण्यावरून ऋषभ पंत दिल्लीला निघून आला. मात्र, त्यावेळी दिल्लीत ऋषभच्या ओळखीचे कोणीही नव्हते आणि त्याची आर्थिक परिस्थितीही बिकट होती. अशावेळी एखाद्याने पुन्हा आपल्या घरचा रस्ता पकडला असता. मात्र, ऋषभने क्रिकेटवरील प्रेमापोटी दिल्लीच्या मोतीबाग परिसरातील गुरूद्वारात राहण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ऋषभ या गुरूद्वारातच झोपत असे. येथूनच तो रोजच्या प्रॅक्टिससाठी जात असे. तसेच लंगरमध्ये मिळणाऱ्या जेवणावर गुजराण करून त्याने अनेक दिवस काढले. अनेक महिने ऋषभ पंत या गुरुद्वारातच मुक्कामाला होता. त्यानंतर स्थानिक पातळीवर ऋषभ नावारूपाला येऊ लागला तसतसे त्याचे दिवस पालटू लागले. अखेर क्रिकेटमधून थोडेफार पैसे मिळू लागल्यानंतर ऋषभने दिल्लीत एक खोली भाड्याने घेतली. यानंतर ऋषभने मागे वळूनच पाहिले नाही. भारताच्या U-19 संघात चमकल्यानंतर ऋषभने अनेक कंपन्यांशी कोटींचे करार केले. रणजी क्रिकेटमध्येही त्याने स्फोटक फलंदाजीचा आणि एकाच मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रचला होता. फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडमध्ये झालेल्या ट्वेन्टी-२० मालिकेतील एका सामन्यात ऋषभला संधी मिळाल्यामुळे भारतीय संघातून खेळण्याचेही ऋषभचे स्वप्न पूर्ण झाले होते.