नवी दिल्ली : करोनाचे संकट टळल्यानंतरी क्रिकेट विश्वात फारसे बदल होणार नाहीत. त्यामुळे क्रिकेटपटूंना यापुढे करोनाच्या धोक्यासहच खेळावे लागेल, असे स्पष्ट मत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) चेंडूला लकाकी देण्यासाठी लाळेचा उपयोग करण्याऐवजी कृत्रिम पदार्थाचा वापर करण्यास परवानगी देण्याबाबत विचार करत आहे. परंतु गंभीरने याव्यतिरिक्त क्रिकेटपटूंना करोनापासून दूर राखण्याचे अन्य पर्याय नाहीत, असे म्हटले आहे.

‘‘चेंडूला लकाकी देण्यासाठी लाळेचा वापर करण्यास बंद करून कृत्रिम वस्तूचा उपयोग नक्कीच केला जाऊ शकतो. परंतु त्याव्यतिरिक्त क्रिकेटमध्ये आणखी बदल घडतील, असे मला वाटत नाही. त्यामुळेच किंबहुना यापुढे क्रिकेटपटूंभोवती नेहमीच करोनाच्या जाळ्यात अडकण्याचे सावट राहिल,’’ असे ३८ वर्षीय गंभीर म्हणाला.

परंतु क्रिकेटमध्ये सामाजिक अंतराचे भान नक्कीच जपता येऊ शकते, असेही गंभीरने सांगितले. ‘‘प्रेक्षकांविना स्टेडियममध्ये सामने खेळवून आणि खेळाडूंना एकमेकांपासून लांब ठेवून तुम्ही नक्कीच सामाजिक अंतराचे भान राखू शकता. परंतु यामुळे क्रिकेटच्या सामन्यांतील मजा हळूहळू नाहीशी होईल. त्याचप्रमाणे प्रत्येक क्रीडा क्षेत्रामध्ये हे सामाजिक अंतर राखता येणे अशक्य आहे,’’ असे गंभीरने सांगितले.