राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या माघारीमुळे बॅडमिंटनमधील पदकाच्या आशा मर्यादित झाल्या होत्या. मात्र सायनाच्या अनुपस्थितीत पारुपल्ली कश्यपने पुरुष एकेरीत तर ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा जोडीने महिला दुहेरीत अंतिम फेरीत धडक मारत पदक पक्के केले. महिला एकेरीत सुवर्णपदकाची दावेदार असणाऱ्या पी.व्ही.सिंधूला उपांत्य फेरीत अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले मात्र कांस्यपदकाच्या लढतीत तिने विजय मिळवत पदक पटकावले.
कश्यपने एक तास आणि २३ मिनिटे चाललेल्या संघर्षपूर्ण लढतीत इंग्लंडच्या राजीव ओयुसेपवर १८-२१, २१-१७, २१-१८ अशी मात केली. चार वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या सामन्यात ओयुसेपने कश्यपला नमवले होते. या पराभवाची परतफेड करत कश्यपने किमान रौप्यपदक निश्चित केले. प्रदीर्घ रॅलीवर भर देत कश्यपने राजीवला निष्प्रभ केले. पहिला गेम गमावल्यानंतरही चिवट खेळ करत कश्यपने आगेकूच केली. तिसऱ्या गेममध्ये ७२ मिनिटे रंगलेली रॅली नावावर करत कश्यपने अंतिम फेरीत धडक मारली.
यंदाच्या हंगामात शानदार फॉर्ममध्ये असणाऱ्या ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा जोडीने मलेशियाच्या एल.वाय. लिम-एल.पेई जिंग जोडीवर २१-७, २१-१२ अशी मात केली. या विजयासह या जोडीने किमान रौप्यपदक पक्के केले. कांस्यपदकासाठीच्या लढतीत पी.व्ही.सिंधूने मलेशियाच्या जिंग यिवर २३-२१, २१-९ असा विजय मिळवत पदकावर नाव कोरले.