अपंगत्वावर मात करत आशियाई पॅरा-सायकलिंग स्पर्धेत कांस्यपदकाला गवसणी

तुषार वैती, मुंबई</strong>

अंगात जिद्द, पायात बळ आणि कठोर मेहनत घेण्याची वृत्ती असेल तर कोणतेही शिखर पार करता येते. पण सीमा सुरक्षा दलात सीमारेषेवर देशाचे रक्षण करणाऱ्या सुधाकर मराठे यांना एका रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमवावे लागल्यानंतर त्यांच्यातील संपूर्ण बळ संपून गेले. परंतु तरीही काहीतरी करून दाखवण्याची जिद्द मनात असलेल्या मराठे यांनी वर्षभरातच आशियाई पॅरा-सायकलिंग स्पर्धेत कांस्यपदक पटकावत देशाचा तिरंगा अभिमानाने फडकावला.

अमृतसर येथील पिकीपिंडमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या १३८ बटालियनमध्ये कार्यरत असणारे मराठे काही दिवसांच्या सुट्टीनिमित्त आपल्या परिवारासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला रेल्वेने जात होते. पत्नी आणि सात वर्षांच्या मुलासोबत प्रवास करताना कंटाळा आल्यामुळे ते दरवाजापाशी येऊन थांबले. पण तोल सुटल्यामुळे ते ट्रॅकवरच पडले आणि ट्रेन त्यांच्या पायावरून पुढे निघून गेली. त्यांच्या परिवाराला याची कोणतीही कल्पना नव्हती. काही वेळेनंतर मराठे कुटुंबीय त्यांची शोधाशोध करू लागले. सहप्रवाशांनी कुणीतरी खाली पडल्याचे सांगितल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

उधमपूर रेल्वे संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांनी सुधाकर मराठे यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान दोन्ही पाय कापण्यात आल्याचे सांगितल्यानंतर त्यांचा धीर खचला. ‘‘अपघातानंतर माझे जीवन जवळपास संपुष्टात आले होते. मी पूर्णपणे खचलो होतो. जगण्याची हिंमतही उरली नव्हती. अखेर माझ्या युनिटने मला हैदराबाद येथील आदित्य मेहता फाऊंडेशनमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. तिथे मला मानसिक धीर देण्यात आला. माझे मनोधैर्य उंचावल्यानंतर अनेक खेळांची ओळख करून देण्यात आली. हाताने सायकल चालवताना माझे कौशल्य पाहून ३० जणांमधून मी निवडला गेलो. मलाही हा खेळ चांगलाच भावला,’’ असे धुळे जिल्ह्य़ातील सिंदखेडा तालुक्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मराठे यांनी सांगितले.

‘‘अपघातानंतर मला यापुढे माझ्या पायांवर उभे राहता येणार नसल्याचे कळल्यानंतर देशाची सेवा करणाऱ्या माझ्यासारख्या सैनिकाला हा धक्का पचवताना खूप कठीण गेले. पण आता देशासाठी काहीतरी करून दाखवायचे ही जिद्द उराशी बाळगली. त्यातच सहा महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर मला ताश्कंद येथील आशियाई पॅरा-सायकलिंग स्पर्धेत पदार्पण करण्याची संधी मिळाली. पहिल्याच प्रयत्नात माझ्या हातातील बळाच्या जोरावर मी कांस्यपदकाला गवसणी घातली,’’ हे सांगताना मराठे यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास झळकत होता. मराठे हे पॅरासायकलिंगमध्ये एच-५ या प्रकारात सहभागी होतात. यापुढे भलेही ते अनेक पदकांना गवसणी घालतील, पण संपूर्ण बळ एकवटून शून्यातून उभे राहणाऱ्या मराठे यांची ही जिद्द नक्कीच कौतुकास्पद आहे.