यष्टीरक्षक मॅथ्यू वेड आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी झळकावलेल्या धडाकेबाज अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अखेरच्या टी२० सामन्यात १८६ धावांचा डोंगर उभारला. कर्णधार मॅथ्यू वेडने सलग दुसऱ्या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. त्याने आजच्या सामन्यात ५३ चेंडूत ८० धावांची खेळी केली. ११व्या षटकात मॅथ्यू वेडला नटराजन गोलंदाजी करत होता. नटराजने टाकलेला चेंडू वेडला टोलवता आला नाही. चेंडू वेडच्या पायाला लागल्यानंतर नटराजन आणि यष्टीरक्षक राहुलने अपील केलं पण पंचांनी मात्र त्याला नाबाद ठरवलं. यावेळी एक वेगळीच घटना घडली.

पंचांच्या निर्णयावर तिसऱ्या पंचांकडे दाद मागण्यासाठी DRS रिव्ह्यू घेण्याची सुविधा टीम इंडियाकडे उपलब्ध होती. विराट कोहली सीमारेषेवर फिल्डींग करत होता. त्याने धावत येऊन पंचांकडे DRSची मागणी केली. त्याची मागणी आधी मान्य करण्यात आली पण नंतर मात्र ती मागणी फेटाळण्यात आली. याचं कारण अतिशय विचित्र असल्याचं निष्पन्न झालं. भारताने DRS रिव्ह्यू मागितला त्याआधीच मैदानावरील मोठ्या स्क्रीनवर त्या शॉटचा रिप्ले दाखवण्यात आला होता. त्यामुळे विराटला DRS चा रिव्ह्यू नाकारण्यात आला.

रिप्लेमध्ये वेड पायचीत बाद असल्याचं स्पष्ट दिसत होतं. पण, स्क्रीनवर दाखवल्यामुळे रिव्ह्यू घेतल्याचं मानत पंचांनी DRSचा निर्णय फेटाळून लावला.