पुण्याला तब्बल ४३ वर्षांनी डेव्हिस चषकाच्या लढतीच्या संयोजनाची संधी मिळाली. पुणे शहराप्रमाणेच देशात अन्य ठिकाणीही टेनिसचा विकास होण्याची आवश्यकता आहे.

डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत अव्वल दर्जाचे यश मिळविण्याची क्षमता भारतीय खेळाडूंकडे निश्चित आहे. संघ निवडण्यासाठी आवश्यक असणारे नियोजन तसेच योग्य सरावाचा अभाव यामुळे गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतीय संघास अपेक्षित असे यश मिळविता आलेले नाही.

टेनिसमधील चारही ग्रॅण्ड स्लॅम तसेच एटीपी मास्टर्स स्पर्धाना जागतिक क्रमवारीतील पहिले वीस ते पंचवीस मानांकित खेळाडू गांभीर्याने घेतात, तेवढे महत्त्व डेव्हिस चषक लढतींना देत नाही. अर्थात काही देश अलीकडे जगज्जेत्या खेळाडूंवर या लढतींमध्ये भाग घेण्यासाठी दडपण आणतात. मात्र काही वेळा हे खेळाडू दुखापत किंवा वैयक्तिक महत्त्वपूर्ण कारणे देत त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत असतात. त्याचा फायदा अन्य देशांना या स्पर्धेत मिळतो. अशा अव्वल मानांकित खेळाडूंनी डेव्हिस चषक लढतीत भाग घेतला तरी अपेक्षेइतकी एकाग्रता ते दाखवत नाहीत. भारतीय खेळाडूंनी डेव्हिस चषक स्पर्धेच्या इतिहासात गोरान इव्हानसेविच याच्यासह अनेक महान खेळाडूंवर मात करण्याचा पराक्रम केला आहे. भारतीय संघाने या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंतही धडक मारली आहे. तरीही या स्पर्धेत भारतीय खेळाडूंबाबत सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव दिसतो.

भारतीय संघातील खेळाडूंची निवड हा गेल्या काही वर्षांमध्ये वादाचाच विषय ठरला आहे. त्यातही लिअँडर पेसला संघात स्थान देण्यावरूनच नेहमीच भांडणे दिसून येऊ लागली आहेत. पेसने आतापर्यंत सात वेळा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. भारताला ऑलिम्पिकमधील टेनिसचे एकमेव पदक त्यानेच मिळवून दिले आहे. अटलांटा येथे १९९६ मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये त्याने कांस्यपदक मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. त्यानंतर टेनिसमध्ये भारताची पाटी कोरीच राहिली आहे. पेस याने डेव्हिस स्पर्धेत आतापर्यंत दुहेरीत ४२ सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे. चाळिशी उलटल्यानंतरही तो अजून ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये पुरुष व मिश्रदुहेरीत अंतिम फेरीपर्यंत धडक मारू शकतो; एवढेच नव्हे तर तेथेही तो विजेतेपद मिळवत आहे. मात्र पेस व महेश भूपती यांच्यात मतभेद निर्माण झाल्यानंतर ऑलिम्पिक व डेव्हिस चषक स्पर्धेत पेसबरोबर योग्य समन्वय ठेवणारे व त्याच्याशी योग्य संवाद करू शकणारे खेळाडू भेटत नाहीत हे भारताचे दुर्दैवच ठरले आहे. यंदाच्या मोसमात पेस व साकेत मायनेनी यांनी स्पेनविरुद्धच्या डेव्हिस लढतीत दुहेरीत जिद्दीने खेळ केला होता. न्यूझीलंडविरुद्ध पुण्यात नुकत्याच झालेल्या डेव्हिस लढतीत याच जोडीवर भारताची मदार होती. मात्र ऐनवेळी साकेतला दुखापत झाली व पेसकरिता नवीन जोडीदार शोधावा लागला. या लढतीच्या वेळी रोहन बोपण्णा याला संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्याचे पेसशी फारसे जमत नाही किंबहुना त्यांच्यात खूप मतभेद आहेत. त्यामुळे पेसशी सुसंवाद व समन्वय करू शकेल असा जोडीदार शोधावा लागला. कझाकिस्तानला जायच्या तयारीत असलेल्या विष्णुवर्धन याला लढतीच्या आदल्या दिवशी पाचारण करावे लागले. पेस व वर्धन यांनी यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये दुहेरीत भाग घेतला असला तरीही या दोन खेळाडूंमधील वयातील दहा-बारा वर्षांचे अंतरच या जोडीच्या डेव्हिस चषक स्पर्धेतील पराभवास कारणीभूत ठरले. एकेरीत युकी भांब्री व रामकुमार रामनाथन यांनी प्रत्येकी दोन सामने जिंकून न्यूझीलंडविरुद्ध संघास विजय मिळवून दिला. मात्र पेस याने डेव्हिस स्पर्धेतून निवृत्ती घेण्याची आवश्यकता आहे. भूपती याच्याकडे भारतीय संघाची जबाबदारी येणार असल्यामुळे पेस याला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. तरीही पेस याने अव्वल कीर्ती असतानाच भारतीय संघातून निवृत्ती घेणे हे त्याच्यासाठी व देशासाठी हितकारक ठरणार आहे.

डेव्हिस लढत ही सांघिक स्वरूपाची लढत असल्यामुळे खेळाडूंचा एकत्रित सराव अतिशय महत्त्वाचा असतो. विशेषत: दुहेरीतील लढतीसाठी निवड झालेल्या खेळाडूंनी किमान सहा-सात दिवस एकत्रित सराव केला पाहिजे. संघाची निवड करताना संघातील राखीव खेळाडूही मुख्य खेळाडूंइतकेच तुल्यबळ लढत देण्याची क्षमता असलेले खेळाडू पाहिजेत. म्हणजे मुख्य फळीतील खेळाडू दुखापतग्रस्त झाला तर ऐनवेळी त्याच्या दर्जाइतका खेळाडू कोण आणायचा याकरिता शोधाशोध व धावाधाव करावी लागत नाही. बऱ्याच वेळा असे दिसते की, दुसऱ्या फळीतील खेळाडू राखीव खेळाडूची भूमिका करण्यास नाखूश असतात. त्याऐवजी ते आंतरराष्ट्रीय मानांकन गुण मिळविण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यास प्राधान्य देतात.

डेव्हिस चषक संघाबाबत कोणत्या मैदानावर खेळायचे याबाबतही खूप ऊहापोह होत असतो. घरच्या मैदानावर हे सामने होतात, तेव्हा क्लेकोर्ट, हार्डकोर्ट, ग्रासकोर्ट आदी कोणत्या प्रकारचे मैदान घ्यायचे हा यजमान संघास हक्क असतो. सहसा भारतीय खेळाडू ग्रासकोर्ट किंवा हार्डकोर्टला प्राधान्य देत असतात. कोणत्याही प्रकारच्या कोर्टवर खेळण्याची क्षमता प्रत्येक खेळाडूकडे असली पाहिजे. ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये किंवा अन्य एटीपी स्पर्धामध्ये खेळताना खेळाडूंना मैदान निवडण्याचा कोणताही अधिकार किंवा स्वातंत्र्य नसते. हे लक्षात घेतल्यास कोणत्याही मैदानावर, कोणत्याही वातावरणात क्षमतेच्या शंभर टक्केइतकी कामगिरी तुम्हाला दाखविता आली तरच तुम्ही महान खेळांडूंच्या यादीत बसू शकता. पेस व भूपती, तसेच सानिया मिर्झा यांनी विविध प्रकारच्या मैदानांवर ग्रँड स्लॅम स्पर्धाचे विजेतेपद मिळविले आहे. भारतीय संघ निवडताना खेळाडूंचा सल्ला जरूर घेतला पाहिजे. मात्र ते म्हणतील ती पूर्व दिशा असे कमकुवत धोरण टेनिस संघटकांनी ठेवून उपयोग नाही.

रामकुमार, युकी आदी खेळाडू परदेशातील अकादमींमध्ये सराव करतात तसेच तेथील स्पर्धामध्येही भाग घेत असतात. दुसऱ्या फळीतील खेळाडूंना अशी संधी उपलब्ध करून देण्यासाठी अखिल भारतीय टेनिस महासंघाने त्यांना पुरस्कृत केले पाहिजे किंवा त्यांच्याकरिता प्रायोजक मिळविले पाहिजेत. खेळाडूंबरोबर अनुभवी फिजिकल ट्रेनर असणे ही काळाची गरज झाली आहे. मानांकन गुण मिळविण्यावर खेळाडू भर देतात ही त्यांची चूक नाही. मात्र असे करताना त्यांना शारीरिक तंदुरुस्तीच्या समस्यांना सामोरे जावे लागते हे ते लक्षात घेत नाहीत व डेव्हिस चषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेच्या वेळी त्यांची कमतरता भारतीय संघास जाणवते. साधारणपणे १८ ते २५ वर्षे वयोगटातील खेळाडूंच्या विकासावर टेनिस संघटकांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

डेव्हिस लढतींकरिता केवळ तीन-चार ठिकाणे मर्यादित न ठेवता देशात अन्य ठिकाणी या लढती झाल्या तर तेथील टेनिसचा प्रसार आणखी वाढू शकतो हे संघटकांनी लक्षात घेतले पाहिजे. पुण्यास तब्बल ४३ वर्षांनी या लढतीच्या संयोजनाची संधी मिळाली. गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये पुणे शहरात टेनिसचा झपाटय़ाने विकास झाला आहे. येथील सराव व प्रशिक्षणाच्या सुविधा, आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक, पूरक व्यायामाच्या सुविधा, प्रायोजकांचा भरघोस पाठिंबा यामुळे अंकिता रैना, नताशा पालहा आदी महाराष्ट्राबाहेरीलही खेळाडू येथे टेनिसचे करिअर करण्यासाठी येऊ लागले आहेत. पुणे शहराप्रमाणेच देशात अन्य ठिकाणीही टेनिसचा विकास होण्याची आवश्यकता आहे. तसे झाले तरच ग्रँड स्लॅम स्पर्धाच्या विविध विभागांमध्ये व डेव्हिस लढतींमध्ये भारतीय खेळाडू अव्वल दर्जाचे यश मिळवू शकतील.
मिलिंद ढमढेरे – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य : लोकप्रभा