, नूर-सुलतान (कझाकस्तान)

नाटय़मय घडामोडींनंतर अखेरीस शुक्रवारपासून त्रयस्थ नूर-सुलतान या शहरात सुरू होणाऱ्या डेव्हिस चषक टेनिस लढतीत पाकिस्तानपुढे बलाढय़ भारतीय संघाचे पारडे जड आहे.

भारत-पाकिस्तान सामन्याच्या स्थळनिश्चितीसंदर्भातील अनिश्चितता अखेपर्यंत जशी टिकून होती, तशीच उभय संघांची खेळाडू निवड प्रक्रियासुद्धा संभ्रमाची होती. आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने हा सामना नूर-सुलतान येथे खेळवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तान टेनिस महासंघाने याविरोधात दाद मागितली होती; परंतु स्वतंत्र लवादाने पाकिस्तानची विनंती फेटाळून लावली.

सुरक्षेच्या प्रश्नामुळे त्रयस्थ ठिकाणी सामना खेळवण्याच्या निषेधार्थ पाकिस्तानचे आघाडीचे खेळाडू ऐसाम उल हक कुरेशी आणि अकील खान यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे भारताच्या सुमित नागल, रामकुमार रामनाथन आणि अनुभवी लिएण्डर पेस यांच्यापुढे आव्हानच उरलेले नाही. भारतीय खेळाडूंकडे ग्रँडस्लॅम स्पर्धामध्ये खेळण्याचा अनुभव गाठीशी आहे. त्या तुलनेत पाकिस्तानचे खेळाडू ‘आयटीएफ’च्या स्पर्धामध्येही झगडताना आढळतात.

पाकिस्तानच्या उदयोन्मुख खेळाडूंना या सामन्यातून बरेच काही शिकता येणार आहे. या सामन्यातील विजेत्या संघाला मार्च २०२० मध्ये क्रोएशिया येथे होणाऱ्या जागतिक गटाच्या पात्रता सामन्यात खेळता येणार आहे.

या सामन्याद्वारे ४६ वर्षीय पेसला आपला डेव्हिस चषक स्पध्रेतील विक्रम उंचावता येणार आहे. गेल्या हंगामात चीनविरुद्ध खेळताना त्याने सर्वाधिक ४३व्या दुहेरीतील विजयाची नोंद केली होती. १८ ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावणारा पेस जीवन नेदुनशेझियानच्या साथीने दुहेरीत खेळणार आहे.

पहिला दिवस (२९ नोव्हेंबर)

* सामन्याची वेळ : दुपारी १.३० वा.

१ पहिल्या एकेरीच्या लढतीत रामकुमारपुढे मुहम्मद शोएबचे आव्हान असेल. ‘आयटीएफ’च्या मुख्य स्पर्धामध्ये शोएब एकही सामना जिंकलेला नाही. याचप्रमाणे चालू वर्षांत तो एकही एकेरीचा सामना खेळलेला नाही.

२दुसऱ्या एकेरीच्या लढतीत सुमितचा हुझैफा अब्दुल रेहमानशी सामना होईल. हुझैफाची कनिष्ठ ‘आयटीएफ’ स्पर्धामधील कामगिरी फारशी समाधानकारक नाही.

दुसरा दिवस (३० नोव्हेंबर)

* सामन्याची वेळ : सकाळी ११.३० वा.

३ तिसऱ्या दुहेरीच्या लढतीत पेस आणि जीवन जोडीपुढे शोएब आणि हुझैफाचे आव्हान असेल.

४ चौथा एकेरी सामना सुमित आणि शोएब यांच्यात होईल. भारताने ३-० अशी आघाडी घेतली, तरी चौथा सामना खेळणे अनिवार्य असेल.

५ पाचवा एकेरी सामना रामकुमार आणि हुझैफा यांच्यात होईल. भारताकडे ४-० अशी आघाडी असल्यास पाचवा सामना न खेळण्याचा पर्याय उपलब्ध असेल.

 

७५ चेन्नईचा डावखुरा टेनिसपटू जीवन नेदुनशेझियान हा डेव्हिस चषक स्पध्रेत प्रतिनिधित्व करणारा भारताचा ७५वा खेळाडू ठरणार आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सुमित नागलला पहिलावहिला विजय नोंदवण्याची संधी असेल. त्याने स्पेन (२०१६) आणि चीन (२०१८) यांच्याविरुद्धचे दोन्ही एकेरीची सामने गमावले आहेत.

७-७ भारताचा एकेरीतील खेळाडू रामकुमार रामनाथनने आतापर्यंत सात सामने जिंकले आहेत, तर सात सामने गमावले आहेत.

पाकिस्तानच्या संघात युवा खेळाडूंचा विशेष भरणा आहे. भारतासारख्या आव्हानात्मक संघाशी ते सामना करीत असल्याने त्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही. झुंजार वृत्तीचे हे खेळाडू आमच्याशी उत्तम लढत देतील; परंतु आम्ही पाकिस्तानविरुद्ध निभ्रेळ यश मिळवू.

– रोहित राजपाल, भारताचा न खेळणारा कर्णधार