सचिन तेंडूलकरच्या हस्ते देण्यात आलेली बीएमडब्ल्यू कार परत केल्यानंतर भारतीय जिमनॅस्टिकपटू दीपा कर्माकरला २५ लाख रुपयांची रक्कम देण्यात आली आहे.  त्या रकमेतून तिने ह्युंडाईची इलांट्रा कार विकत घेतली असल्याचे तिचे प्रशिक्षक बिस्वेश्वर नंदी यांनी म्हटले. हैदराबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात सचिन तेंडूलकरच्या हस्ते साक्षी मलिक, पी. व्ही. सिंधू, पी. गोपीचंद आणि दीपा कर्माकरला बीएमडब्ल्यू देण्यात आल्या होत्या. हैदराबाद बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष व्ही. चामुंडेश्वर यांनी या चौघांना कार दिल्या होत्या.

dipa_pti-m_148301921093_670x400

अगरतळामधील रस्ते अरुंद आहेत आणि खूप खड्डे आहेत त्यामुळे ती कार चालवणे अवघड होत असल्याचे तिने म्हटले होते. त्यामुळेच ही कार परत करण्याचा ती विचार करीत होती. शिवाय, अगरतळामध्ये बीएमडब्ल्यूचे सर्व्हिस सेंटर देखील नाही. तेव्हा इतकी महागडी कार सांभाळायची कशी असा प्रश्न तिला पडला होता. त्यामुळेच तिने आपली कार परत करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाबद्दल तिने चामुंडेश्वर यांना कळवले. त्यांनी तिला कारच्या किमतीइतकी रक्कम देऊ असे म्हटले होते.

इतकेच नव्हे तर अगरतळा येथे काही बीएमडब्ल्यूच्या सर्व्हिसिंगची काही व्यवस्था होऊ शकते हे देखील त्यांनी पाहिले परंतु कुठलीही व्यवस्था होत नसल्याचे पाहून तिला २५ लाख रुपये देण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. अगरतळामध्ये ह्युंडाईचे शोरुम आहे त्यामुळे तिने ती कार विकत घेण्याचा निर्णय घेतला. दीपा कर्माकरचे ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक थोडक्यात हुकले होते. प्रोडुनोव्हा या जीवघेण्या प्रकारात तिने आपले शानदार प्रदर्शन केले होते. यानंतर तिचे सर्व स्तरातून कौतुक झाले होते.