सनरायझर्स हैदराबादवर सहा विकेट्स राखून विजय
रायपूरच्या फलंदाजांना आव्हानात्मक खेळपट्टीवर दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने १५९ धावांचे लक्ष्य पेलत सनरायझर्स हैदराबाद संघावर सहा विकेट्सनी थरारक विजय मिळवला. ८३ धावांची खेळी करणारा करुण नायर या विजयाचा शिल्पकार ठरला. या विजयानंतरही दिल्लीला बाद फेरीसाठी शेवटच्या साखळी लढतीत विजय मिळवणे आवश्यक आहे. मुस्ताफिझूर रेहमान आणि भुवनेश्वर कुमारची भेदक गोलंदाजी आणि बरिंदर सरणने १९व्या षटकात घेतलेला अफलातून झेल यांच्या बळावर सनरायझर्स हैदराबादने विजयासाठी आटोकाट प्रयत्न केला, मात्र तो अपुराच ठरला.
लक्ष्याचा पाठलाग करताना क्िंवटन डी कॉक २ धावा करून तंबूत परतला. यानंतर ऋषभ पंत व करुण नायर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली. २६ चेंडूंत ३२ धावांची खेळी करुन ऋषभ सरणच्या गोलंदाजीवर बाद झाला. वाढत्या धावगतीचे दडपण न घेता करुणने दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने ५९ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ८३ धावा केल्या.
तत्पूर्वी, डेव्हिड वॉर्नरच्या (७३) अर्धशतकी खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने १५८ धावांची मजल मारली. दिल्लीने नाणेफेकीचा कौल जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि दीपक हुडा चोरटी धावचीत झाले व हैदराबादची अवस्था २ बाद ४८ अशी झाली. पाठोपाठ युवराज सिंगला कालरेस ब्रेथवेटने त्रिफळाचीत केले. त्याने १० धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
सनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत ७ बाद १५८ (डेव्हिड वॉर्नर ७३; कालरेस ब्रेथवेट २/२७) पराभूत विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकांत ४ बाद १६१ (करुण नायर ८३; बरिंदर सरण १/२४)
सामनावीर : करुण नायर