रायझिंग पुणे सुपर जायंट्सविरुद्ध आज सामना

गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभूत झालेला दिल्ली डेअरडेव्हिल्सचा संघ अजूनही बाद फेरीच्या स्पर्धेत कायम आहे. मंगळवारी त्यांचा सामना रायझिंग पुणे सुपर जायंट्सविरुद्ध होणार असून या सामन्यात विजयासह बाद फेरीत पोहोचण्याच्या दिशेने कूच करण्यासाठी दिल्लीचा संघ प्रयत्नशील असेल. दुसरीकडे महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील पुण्याचा संघ सध्याच्या घडीला गुणतालिकेत तळाला असून त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. पण उर्वरित काही सामन्यांमध्ये प्रतिस्पध्र्याना धक्का देण्यासाठी पुण्याचा संघ आतूर असेल.

आतापर्यंत ११ सामन्यांमध्ये दिल्लीने व सहा सामने जिंकत १२ गुण कमावले आहे. गुणतालिकेत दिल्लीचा संघ पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे यापुढील तिन्ही सामने जिंकल्यास त्यांना बाद फेरीत पोहोचण्याची संधी असेल. दिल्लीचा फिरकीपटू अमित मिश्रा चांगल्या फॉर्मात असून त्याने आतापर्यंत १३ बळी मिळवले आहेत. त्याचबरोबर ख्रिस मॉरीस आमि कर्णधार झहीर खान यांनीही सातत्यपूर्ण मारा केला आहे. त्यामुळे दिल्लीला जेवढी गोलंदाजीची चिंता नसेल तेवढी फलंदाजीची आहे. दिल्लीच्या संघात युवा खेळाडूंचा अधिक भरणा असला तरी त्यांना कामगिरीमध्ये सातत्य राखता आलेले नाही. क्विंटन डी’कॉक हा त्यांचा एकमेव फलंदाज चांगली कामगिरी करताना दिसत आहे. त्यामुळे दिल्लीला जर यापुढील तिन्ही सामने जिंकायचे असतील तर त्यांना फलंदाजीवर अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. यामध्ये करुण नायर, संजू सॅमसन, रिषभ पंत यांच्याकडून संघाला आशा आहेत.

पुण्याचा संघ हा अजिंक्य रहाणेवर अधिक अवलंबून असल्याचे दिसून आले आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनीला या संपूर्ण स्पर्धेत छाप पाडता आलेली नाही. बऱ्याच विजयाच्या संधी त्याने घालवल्या आहेत. थिसारा परेरा आणि सौरभ तिवारी यांच्याकडून काही चांगल्या खेळी पाहायला मिळाल्या असल्या तरी त्यांच्या कामगिरीत सातत्य पाहायला मिळालेले नाही. पुण्याच्या एकाही गोलंदाजाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

संघ

दिल्ली डेअरडेव्हिल्स : झहीर खान (कर्णधार), क्विंटन डी’कॉक, जेपी डय़ुमिनी, मयंक अगरवाल, श्रेयस अय्यर, कालरेस ब्रेथवेट, करुण नायर, पवन नेगी, रिषभ पंत, संजू सॅमसन, पवन सुयल, जयंत यादव, ख्रिस मॉरिस, सॅम बिलिंग्स, नॅथन कल्टर-निल, इम्रान ताहिर, महिपाल लोमोर, चामा मिलिंद, अमित मिश्रा, मोहम्मद शमी, शाहबाझ नदीम, खलील अहमद, अखिल हेरवाडकर, प्रत्युष सिंग.

रायझिंग पुणे सुपर जायंट्स : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), अजिंक्य रहाणे, केव्हिन पीटरसन, फॅफ डय़ू प्लेसिस, स्टिव्हन स्मिथ, मिचेल मार्श, जसकिरण सिंग, आर. अश्विन, अंकित चव्हाण, अ‍ॅल्बी मॉर्केल, इरफान पठाण, इशांत शर्मा, ईश्वर पांडे, थिसारा परेरा, सौरभ तिवारी, आर. पी. सिंग, रजत भाटिया, अंकुश बैन्स, बाबा अपराजित, मुरुगन अश्विन, अशोक दिंडा, दीपक चहार, स्कॉट बोलँड, पीटर हँडस्कॉम्ब आणि अ‍ॅडम झाम्पा.

वेळ : रात्री ८.०० वाजल्यापासून.  प्रक्षेपण : सोनी सिक्स आणि सेट मॅक्सवर.