भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या मोबाईलवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. दिल्लीतील हॉटेलमध्ये लागलेल्या आगीदरम्यान धोनीचे तीन मोबाईल चोरीला गेले असून याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडे धोनीने गुन्हा नोंदवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेसाठी महेंद्रसिंह धोनी दिल्लीत आला होता. धोनीसह झारखंडची संपूर्ण टीम द्वारका परिसरातील एका हॉटेलमध्ये उतरली होती. या हॉटेलमध्ये शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली होती. धूर दिसताच धोनीने प्रसंगावधान दाखवत संघातील सर्व खेळाडूंना सुखरुप हॉटेलबाहेर काढण्यात मोलाची भूमिका निभावली. मात्र यादरम्यान चोरट्यांनी धोनीच्या मोबाईलवर डल्ला मारला. तीन मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार धोनीने पोलिसांकडे नोंदवली आहे. पोलिसांनीही गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजही तपासून बघितले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या मोबाईल फोनमध्ये बीसीसीआय आणि टीम इंडियाशी संबंधीत महत्त्वपूर्ण माहिती असल्याचे सूत्रांकडून समजते.

हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत झारखंडच्या संघाची क्रिकेट किट जळून खाक झाली होती. या आगीमुळे हजारे चषकातील पश्चिम बंगाल विरुद्ध झारखंड हा सामना शुक्रवारीऐवजी शनिवारी घ्यावा लागला. शनिवारी झालेल्या उपांत्य झारखंडला बंगालकडून ४१ धावांनी पराभव पत्करावा लागला. मात्र धोनीने धडाकेबाज ७० धावा करीत चाहत्यांची मने जिंकली. श्रीवत्स गोस्वामी व अभिमन्यू ईश्वरन यांची शैलीदार शतके तसेच त्यांनी सलामीसाठी केलेली १९८ धावांची तडाखेबाज भागीदारी यामुळेच बंगाल संघाला ५० षटकांत ४ बाद ३२९ धावांची मजल गाठता आली होती. विजयासाठी ३३० धावांचे लक्ष्य गाठताना झारखंडला ५० षटकांमध्ये २८८ धावांपर्यंतच पोहोचता आले. कर्णधार धोनी व इशांक जग्गी यांनी शानदार अर्धशतके झळकावूनही त्यांना अपेक्षेइतका वेग ठेवता आला नाही. अंतिम फेरीत बंगालचा तामिळनाडूशी सामना होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi ms dhoni three mobile phones stolen during fire at hotel in dwarka
First published on: 19-03-2017 at 09:54 IST