करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरात लोकप्रिय असलेल्या गोल्ड जिम समूहावर दिवाळखोरीची वेळ आली असून यासाठी त्यांनी सरकारकडे संरक्षणाची मागणी केली आहे.

गोल्ड समूहाच्या जगभरात ७००हून अधिक व्यायामशाळा असून त्यापैकी ३० व्यायामशाळा गेल्या महिन्याभरात बंद पडल्या आहेत. त्यामुळेच गोल्ड जिम समूहाचे मालक अ‍ॅडम झेटसिफ यांनी प्रशासन आणि ग्राहकांकडेच यापासून बचावाची मागणी केली आहे.

‘‘करोनाचे संकट टळल्यावर आम्हाला गोल्ड जिमची कार्यप्रणाली पूर्वीप्रमाणे सुरू करायची आहे. परंतु त्यापूर्वीच गोल्ड जिमचे अस्तित्व नष्ट होण्याची भीती मला सतावते आहे. त्याचप्रमाणे आमच्यावरील कर्जाचे भारही वाढले असल्याने प्रशासन आणि आमच्या ग्राहकांनीच आम्हाला यापासून वाचवावे,’’ असे अ‍ॅडम म्हणाले. १९६५पासून सुरू झालेल्या गोल्ड जिमवर सध्या १.६५ अब्ज अमेरिकन डॉलर इतके कर्ज आहे.

राज्यातील व्यायामशाळांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

टाळेबंदीमुळे राज्यातील व्यायामशाळा आणि आरोग्य केंद्रे पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेले सर्व प्रशिक्षक व  कर्मचारी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवत आहेत. त्यांच्या मदतीसाठी भारतीय शरीरसौष्ठव महासंघाचे सरचिटणीस चेतन पाठारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घातले आहे.

‘‘व्यायाम क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जवळपास सर्वच व्यायामशाळा व फिटनेस सेंटरच्या जागा या भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत.  जागेचे भाडे, विद्युत आकार, व्यायाम साधनांची दुरुस्ती व देखभालीचा खर्च, स्वच्छता, प्रशासकीय खर्च, कर्मचारी व प्रशिक्षकांचा पगार, व्यायामाची उपकरणे घेताना काढलेल्या कर्जाचे हप्ते यांची सांगड घालत आपला उद्योग चालू ठेवणे म्हणजे एक मोठे आव्हान बनले आहे,’’ असे पाठारे यांनी म्हटले आहे.

व्यायामशाळा आणि आरोग्य केंद्रांना दिलासा देण्यासाठी करमाफी, सहा महिन्यांची मालमत्ता करमाफी, तीन महिन्यांची वीज बिलमाफी द्यावी. तसेच राज्यातील सर्व व्यायामशाळा, शरीरसौष्ठवपटू आणि प्रशिक्षकांना विशेष आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.