सौराष्ट्रची पहिल्या दिवशी ८ बाद १९२ अशी अवस्था; वासावडा व मंकड यांनी सौराष्ट्रला सावरले
प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील सौराष्ट्रविरुद्धच्या अंतिम सामन्याचा पहिला दिवस गाजवला. मात्र अर्पित वासावडा व प्रेरक मंकड यांनी केलेल्या दमदार अर्धशतकांमुळेच सौराष्ट्रला पहिल्या डावात ८४.४ षटकांत ८ बाद १९२ धावांपर्यंत मजल मारता आली. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर बुधवारपासून सुरू झालेल्या या सामन्यात पहिला दिवस मुंबईच्याच गोलंदाजांनी गाजवला. त्यांचे मुख्य अस्त्र असलेल्या धवल कुलकर्णी याच्यासह त्यांच्या गोलंदाजांनी अनुकुल खेळपट्टीचा फायदा सौराष्ट्राच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. वासावडा व मंकड यांचा अपवाद वगळता सौराष्ट्रच्या भरवशाच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केली.
मुंबईच्या गोलंदाजांनी अचूक दिशा व टप्पा ठेवत मारा केला. पण सौराष्ट्रच्या फलंदाजांनी निष्काळजीपणे फटके मारून अप्रत्यक्षरीत्या त्यांना मदत केली. वासावडा व मंकड यांनी ३२.४ षटकांत आठव्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी करीत संघाला सावरले. या दोघांनीही शानदार अर्धशतके झळकावली. मुंबईकडून धवल कुलकर्णीने चार बळी घेतले.
खेळपट्टी वेगवान गोलंदाजीला पोषक असल्यामुळे दोन्ही संघांनी प्रत्येकी चार वेगवान गोलंदाजांना खेळण्याची संधी दिली. मुंबईचा कर्णधार आदित्य तरेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. अवी बारोट व सागर जोगियानी यांनी आक्रमक फटके मारत सौराष्ट्राच्या डावाचा प्रारंभ केला. डावाच्या सातव्या षटकांत धवलने सौराष्ट्रच्या डावाला खिंडार पाडले. त्याने बरोटला १४ धावांवर बाद केले. पाठोपाठ शार्दूल ठाकूरने जोगियानीला तंबूत धाडले. सौराष्ट्रचा आधारस्तंभ असलेल्या चेतेश्वर पुजाराला केवळ ४ धावांवर बाद करीत सौराष्ट्रस मोठा धक्का दिला. या धक्क्यातून सौराष्ट्र सावरत नाही, तोच त्यांनी शिल्डन जॅक्सनची (०)
विकेट गमावली. एका बाजूने वासावडाने आत्मविश्वासाने खेळ केला. उपाहाराला सौराष्ट्रची ३४ षटकांत ४ बाद ७३ अशी स्थिती होती.
धवलने उपाहारानंतर सौराष्ट्राला आणखी एक धक्का दिला. त्याने कर्णधार जयदेव शहाला (१३) बाद केले. वासावडा व शहा यांनी ३५ धावांची भर घातली. शहाच्या जागी आलेल्या चिराग जानीला फारसा सूर सापडला नाही. त्याला ठाकूरने १३ धावांवर तंबूत परतवले. जानीच्या जागी आलेल्या दीपक पुनियाला शून्यावर मिळालेल्या जीवदानाचा लाभ घेता आला नाही. केवळ सहा धावा काढून तो बाद झाला. चहापानापर्यंत सौराष्ट्राने ५८ षटकांत ७ बाद १२६ धावांपर्यंत मजल गाठली होती. त्यामध्ये वासावडाने केलेले अर्धशतक हीच त्यांच्यासाठी जमेची बाजू होती. चहापानानंतर वासावडा व प्रेरक मंकड यांनी चिवट झुंज दिली. त्यांनी अर्धशतकी भागीदारी करीत खेळपट्टीवर आत्मविश्वासाने कसे खेळायचे, याचा आदर्श घालून दिला. रणजीत पदार्पण करणाऱ्या मंकडने वासावडाला योग्य साथ दिली. ही जोडी गोलंदाजीच्या बदलास दाद देत नाही, हे पाहून मुंबईने ८२व्या षटकाच्या वेळी नवा चेंडू घेतला.
पहिला सामना असूनही मंकडने शानदार खेळ केला. त्याने ठाकूरला चौकार मारून अर्धशतक साजरे केले. ही जोडी अखेपर्यंत राहणार असे वाटत असतानाच धवलने दिवसाच्या अखेरच्या षटकांत वासावडाला बाद करत ही जोडी फोडली. वासावडाने प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये १३वे अर्धशतक साकारताना ७७ धावा केल्या. जवळपास संपूर्ण दिवस खेळ करताना त्याने २१४ चेंडूंमध्ये सहा चौकार मारले. मंकडने पाच चौकारांसह नाबाद ५५ धावा करताना स्पर्धेतील पहिलेच अर्धशतक नोंदवले.

संक्षिप्त धावफलक
सौराष्ट्र (पहिला डाव) : ८४.४ षटकांत ८ बाद १९२ ( अर्पित वासावडा ७७, प्रेरक मंकड खेळत आहे ५५; धवल कुलकर्णी ४-३०, शार्दूल ठाकूर २-५९, अभिषेक नायर १-४२, बलविंदरसिंग संधू (कनिष्ठ) १-४१).
वेळ : स. ९.३० वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २