महाराष्ट्राचा तरुण गोलंदाज दिग्विजय देशमुखवर आयपीएलच्या लिलावात मुंबई इंडियन्सने बोली लावली. २० लाखांच्या बोलीवर दिग्विजय आगामी हंगामात मुंबईच्या संघाकडून खेळणार आहे. स्थानिक खेळाडूवर मुंबईसारख्या संघाने लावलेल्या बोलीमुळे अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. सय्यद मुश्ताक अली आणि रणजी करंडक स्पर्धेत दिग्विजयने आपल्या गोलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकीत केलं होतं. मात्र याच गोलंदाजी शैलीमुळे दिग्विजयला आपलं संघातलं स्थान गमवावं लागलं आहे.

दिग्विजयच्या शैलीविरोधात तक्रार आल्यामुळे त्याला छत्तीसगडविरोधातील रणजी सामन्याला मुकावं लागलं आहे. “दिग्विजयच्या शैलीबद्दलचा अहवाल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला मिळाला आहे, पुढील कारवाईसाठी संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक यांना अहवाल पाठवण्यात आला आहे. दिग्विजयवर आता निलंबनाची कारवाई करण्यात येणार नसली तरीही त्याला सध्या खेळता येणार नाही. दिग्विजय हा गुणी गोलंदाज आहे, सध्या तो जलदगती गोलंदाजांसाठी असलेल्या MRF अकादमीत सराव करतोय. त्याच्या शैलीत काही आक्षेपार्ह आढळलं तर त्यात सुधारणा करण्यासाठी त्याला पूर्ण मदत केली जाईल”, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सचिव रियाज बागवान यांनी आपली बाजू स्पष्ट केली.

दिग्विजय हा बीड जिल्ह्यातील आंबेजोगाईचा रहिवासी आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्विजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्विजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्विजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्विजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.