सेंट लुशिया कसोटीत बॉल टॅम्परिंग केल्याचा आरोपामुळे एका कसोटीच्या निलंबनाची शिक्षा भोगत असलेल्या, श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडीमलने आपल्या शिक्षेला आव्हान दिलं आहे. सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी दिनेशच्या मानधनातली सर्व रक्कम कापून घेऊन त्याच्यावर एका कसोटी सामन्याचं निलंबन टाकलं होतं. मात्र दिनेश चंडीमलने या प्रकरणात आपला दोष नसल्याचं म्हटलं होतं. यानंतर श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या सहाय्याने चंडीमलने आपल्या शिक्षेला आव्हान देण्याचं ठरवलं आहे.

दिनेश चंडीमलवर दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान चेंडूवर कृत्रिम वस्तुने आकार बदलवण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. यादरम्यान श्रीलंकेचा संघ तिसऱ्या दिवशीच्या खेळासाठी मैदानात उतरलाच नाही. परिणामी तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होण्यासाठी दोन तास उशीर झाला होता. यासाठी पंच अलिम दार आणि इयन गुल्ड यांनी श्रीलंकेच्या संघाला दंड ठोठावत वेस्ट इंडिजला ५ धावा बोनस म्हणून बहाल केल्या होत्या.

अवश्य वाचा – श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडीमल बॉल टॅम्परिंगप्रकरणात दोषी; एका सामन्यासाठी निलंबित

सेंट लुशियात बॉल टॅम्परिंगचा प्रकार गाजल्यानंतर या प्रकरणाचं व्हिडीओ फुटेजही समोर आलं होतं. ज्यामध्ये चंडीमल चेंडुवर एक वस्तु लावताना दिसत होता. सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांच्या मते, “व्हिडीओ फुटेजमध्ये दिनेशने आपल्या खिशातून एक गोष्ट काढून ती आपल्या तोंडात टाकली व त्यानंतर त्याच वस्तुने बॉलला लकाकी देण्याचा प्रयत्न केला. याच आधारावर दिनेशवर कारवाई करण्यात आली आहे.” त्यामुळे दिनेश चंडीमलने दिलेल्या आव्हानावर काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान ३ कसोटी सामन्यांच्या या मालिकेत वेस्ट इंडिज सध्या १-० अशा आघाडीवर आहे.