जीवघेणी दुखापत होऊनही त्यानंतर तंदुरुस्त झाल्यानंतर रशियाची जिम्नॅस्ट एलिया मुस्ताफिनाने लंडन येथे २०१२मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये चार पदकांची कमाई केली. माझ्यासाठी तीच प्रेरणास्थान आहे. तिच्याप्रमाणेच मला यश मिळवायचे आहे, असे भारताची ऑलिम्पिक जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकरने सांगितले.

एलियाला पायातील स्नायूंच्या मोठय़ा दुखापतीमुळे काही महिने विश्रांती घ्यावी लागली होती. तिची जिम्नॅस्टिक्स कारकीर्द धोक्यात येण्याची वेळ आली होती. मात्र तंदुरुस्त झाल्यानंतर तिने जिद्दीने मेहनत करीत ऑलिम्पिक पदकांवर मोहोर उमटवली. दीपालादेखील एलियाप्रमाणेच मोठय़ा दुखापतीला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे काही महिने तिला सरावापासून वंचित राहावे लागले आहे.

‘‘दुखापतीमधून मी पूर्णपणे तंदुरुस्त झाले आहे. दुखापत माझ्या दृष्टीने इतिहासजमा झाली आहे. आता फक्त सराव हेच माझे जीवन आहे. रिओ येथील ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक थोडक्यात गमवावे लागले, याचे दु:ख मला अजूनही वाटत आहे. २०२०च्या ऑलिम्पिकमध्ये पदकाचे स्वप्न साकार करण्यासाठी मी आतापासूनच तयारी करीत आहे,’’ असे दीपाने सांगितले.

ती पुढे म्हणाली, ‘‘माझे प्रशिक्षक विश्वेश्वर नंदी यांनी दुखापतीमधून तंदुरुस्त होत असताना कोणता व्यायाम केला पाहिजे व तंदुरुस्त झाल्यानंतर कसा सराव केला पाहिजे, याबाबत वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अनंत जोशी यांच्या सल्ल्यानुसार कार्यक्रम आखला आहे. मला भारतीय क्रीडा प्राधिकरणाचीही खूप मदत मिळत आहे. दुखापतीमुळे सराव करता आला नाही, याचे दु:ख वाटत असले तरीही मानसिकदृष्टय़ा मी अतिशय कणखर आहे.’’