भारताची अव्वल खेळाडू दीपिका पल्लीकल हिने टेक्सास खुल्या स्क्वॉश स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. तिने उपांत्य फेरीत आर्यलडच्या मॅडेलिना पेरी हिच्यावर ३-२ असा निसटता विजय नोंदवला.
चुरशीच्या झालेल्या या लढतीत दीपिकाने ११-७, ११-१३, १३-११, १०-१२, ११-४ असा रोमहर्षक विजय संपादन केला. २२ वर्षीय खेळाडू दीपिकाने यंदा प्रथमच अव्वल दर्जाच्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. तिला विजेतेपदासाठी इजिप्तच्या नूर एल शेर्बिनी हिच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. उपांत्य फेरीत शेर्बिनी हिने मलेशियाची अव्वल मानांकित खेळाडू निकोली डेव्हिड हिच्यावर सनसनाटी विजय नोंदविला. उपांत्य लढतीनंतर दीपिका म्हणाली, ‘‘मला हा सामना जिंकण्यासाठी खूपच संघर्ष करावा लागला. पेरी ही अतिशय अनुभवी खेळाडू आहे. मी तिच्याविरुद्ध कसे खेळावयाचे, याचे नियोजन केले होते आणि त्यानुसारच माझा खेळ झाल्यामुळे हा सामना मी जिंकू शकले. अंतिम फेरीत शेर्बिनीविरुद्धही मला संघर्ष करावा लागणार आहे. तिने या स्पर्धेत आतापर्यंत अनपेक्षित विजय नोंदविले आहेत. त्यामुळे मी तिला कमी लेखत नाही.’’