एपी, पॅरिस

जागतिक क्रमवारीत अनुक्रमे पहिल्या आणि तिसऱ्या स्थानी विराजमान असलेल्या नोव्हाक जोकोव्हिच आणि राफेल नदाल या दोन मातब्बर टेनिसपटूंमधील द्वंद्व चाहत्यांना शुक्रवारी पाहायला मिळेल. फ्रेंच टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत जोकोव्हिच आणि नदाल आमनेसामने येणार आहेत.

सर्बियाच्या अग्रमानांकित जोकोव्हिचने बुधवारी मध्यरात्री झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात इटलीच्या मॅटिओ बॅरेट्टिनीला ६-३, ६-२, ६-७ (५-७), ७-५ असे चार सेटमध्ये पराभूत केले. त्यापूर्वी, नदालने बुधवारी अर्जेटिनाच्या दिएगो श्वाट्र्झमनला ६-३, ४-६, ६-४, ६-० असे नमवून तब्बल १४व्यांदा या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

गतवर्षी ३५ वर्षीय नदालने जोकोव्हिचलाच अंतिम फेरीत नमवून फ्रेंच स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे यावेळी ३४ वर्षीय जोकोव्हिच त्या पराभवाचा वचपा घेतानाच नदालचे साम्राज्य संपुष्टात आणणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. जोकोव्हिच-नदाल यांच्यात आतापर्यंत ५७ सामने झाले असून जोकोव्हिचने २९, तर नदालने २८ लढती जिंकल्या आहेत. ग्रँडस्लॅम स्पर्धामध्ये मात्र नदाल १०-६ असा आघाडीवर आहे. फ्रेंच स्पर्धेत तर त्याने जोकोव्हिचला तब्बल सात वेळा धूळ चारली आहे. जोकोव्हिचला मात्र एकदाच अशी कामगिरी जमली आहे. २०१५मध्ये जोकोव्हिचविरुद्ध नदालला फ्रेंच स्पर्धेतील अखेरचा पराभव पत्करावा लागला आहे.

शुक्रवारी पहिल्या उपांत्य सामन्यात ग्रीसचा पाचवा मानांकित स्टेफानोस त्सित्सिपास आणि जर्मनीचा सहावा मानांकित एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील. झ्वेरेव्ह प्रथमच या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. तर त्सित्सिपासने सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. या दोघांपैकी एकाने यंदा विजेतेपद मिळवल्यास टेनिसविश्वात नव्या ताऱ्याचा उदय होईल.

’ वेळ : सायं. ६.३० वा.

’थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स

सिलेक्ट १ आणि एचडी वाहिनी.

फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा