बांगलादेश क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसनला आयसीसीने दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावली आहे. शाकीब अल हसनला काही बुकींनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र शाकीबने ही बाब आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाकडे कळवली नाही. त्यामुळे आयसीसी नियमांचा भंग केल्या प्रकरणी शाकीबवर बंदी घालण्यात आली आहे. आता या प्रकरणातलं भारतीय कनेक्शन समोर आलं आहे.

शाकीब अल हसनशी संपर्क साधलेल्या या बुकीचं नाव दिपक अग्रवाल असं असून तो २०१७ ते २०१८ या काळात शाकीबशी संपर्कात होता. दिपक अग्रवालकडून शाकीबला संघात होणाऱ्या बैठकीत काय ठरतंय याची माहिती हवी होती. यादरम्यान शाकीब आयपीएलमध्ये सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळत होता. घडलेल्या प्रकाराबद्दल शाकीबने आयसीसीकडे तक्रार न केल्यामुळे त्याच्याविरोधात संशयाचं जाळ निर्माण झालं आहे. शाकीबने अनेकदा दिपक अग्रवालसोबत Whats App वर संभाषण केल्याचं समोर आलं आहे. जानेवारी २०१८ मध्ये दिपकने शाकीबकडे बांगलादेश-श्रीलंका-झिम्बाब्वे या तिरंगी मालिकेदरम्यान संघातील बैठकीची माहिती मागितली होती. एका संभाषणात दिपकने शाकीबला, आपण काम करायचं आहे की मी आयपीएलपर्यंत थांबू? असा प्रश्न विचारल्यामुळे आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने शाकीबवर कारवाई केली आहे.

याचसोबत तिरंगी मालिकेदरम्यान दिपकने वारंवार शाकीबकडे संघाच्या माहितीसाठी तगादा लावला होता. तसेच आयपीएलमध्ये सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब या सामन्यात एक विशिष्ठ खेळाडू अंतिम ११ संघात आहे की नाही याबद्दलचीही माहिती दिपकने शाकीबला विचारल्याचं समोर आलंय. आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या चौकशीदरम्यान शाकीबने आपण दिपक अग्रवालला कोणत्याही स्वरुपाची माहिती दिली नसून मला दिपककडून कोणत्याही प्रकरात भेटवस्तू किंवा पैसे मिळालेले नसल्याचं स्पष्ट केलं. शाकीबने आपली चूक चौकशीदरम्यान मान्य केल्यामुळे शाकीबवर (Backdated Suspension) कारवाई केली आहे.