‘बीसीसीआय’चे लक्ष्य; ‘आयपीएल’चे क्रिकेटपटू सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार

नवी दिल्ली : सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेसह १९ नोव्हेंबरपासून देशांतर्गत क्रिकेट हंगामाला प्रारंभ करण्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) योजना आहे. त्यामुळे इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सामील होणारे क्रिकेटपटू मात्र पहिल्या हंगामाला मुकण्याची शक्यता आहे.

करोनाच्या साथीमुळे ‘बीसीसीआय’च्या स्थानिक क्रिकेट हंगामावर परिणाम होणार आहे. मुश्ताक अली करंडक आणि रणजी करंडक या स्पर्धाचेच ३८ संघांचे गतवर्षी १३ डिसेंबर ते १० मार्च या कालावधीत एकूण २४५ सामने झाले होते. त्यामुळे विजय हजारे करंडक, दुलीप करंडक किंवा चॅलेंजर सीरिज या स्पर्धा यंदा रद्द कराव्या लागणार आहेत. इराणी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठीही तारीख उपलब्ध होऊ शकणार नाही.

‘‘यंदाच्या देशांतर्गत क्रिकेट हंगामासाठी तात्पुरता आराखडा तयार करण्यात आला असून, १९ नोव्हेंबर ही तात्पुरती तारीख निश्चित करण्यात आली आहे. हे वेळापत्रक आता ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष सौरव गांगुलीकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे,’’ अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

‘आयपीएल’मधून परतल्यानंतर १४ दिवसांच्या विलगीकरणानंतरच भारतीय क्रिकेटपटूंना स्थानिक क्रिकेट सामन्यांमध्ये खेळता येईल, हे मात्र स्पष्ट करण्यात आले आहे.