महेंद्रसिंह धोनीनंतर भारतीय संघाच्या कर्णधारपदाची सुत्र ही विराट कोहलीच्या हातात आली. यानंतर दिवसेंदिवस कोहलीने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केलं आहे, प्रत्येक मालिकेत विराट कोहली धावांचा रतीब घालतो आहे. त्याच्या या फलंदाजीमुळे विराटची सचिन तेंडुलकरसोबत तुलना व्हायला सुरुवात झाली आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगच्या मते सध्याच्या घडीला विराट कोहलीची सचिन तेंडुलकरशी तुलना करणं योग्य ठरणार नाही.

“सध्याच्या घडीला विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरची तुलना करणं योग्य ठरणार नाही. लहान वयात आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात करणारा सचिन तेंडुलकर त्याच्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यातही तितकाच चांगला खेळत होता. सध्या प्रत्येक जण विराटची सचिनशी तुलना करतोय, मात्र १०-१५ वर्षानंतरही विराट आपल्या कामगिरीतलं सातत्य असचं कायम राखतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.” रिकी पाँटींगने आपलं मत मांडलं.

सचिनने तिन्ही प्रकाराच्या क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध केलं आहे. २०० कसोटी सामने खेळणं ही सोपी गोष्ट नाही. विराट आपल्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात सचिनएवढा स्टॅमिना आणि खेळ कायम राखू शकतो का यावरुन त्याची सचिनशी तुलना होऊ शकेल, असं पाँटींग म्हणाला. २०० कसोटी सामन्यांमध्ये सचिनच्या नावावर ५१ शतकं जमा आहेत. तर विराट कोहलीच्या नावावर आतापर्यंत ७१ कसोटींमध्ये २३ शतकांची नोंद झालेली आहे.

अवश्य वाचा – सचिन तेंडुलकरने जाधवपूर युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट पदवी नाकारली