scorecardresearch

सचिन तेंडुलकरने जाधवपूर युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट पदवी नाकारली

पदवी स्विकारणं नैतिकतेला धरुन नाही – सचिन

सचिन तेंडुलकर (संग्रहीत छायाचित्र)

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने पश्चिम बंगालमधील जाधवपूर युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट पदवी स्विकारण्यास नकार दिला आहे. जाधवपूर युनिव्हर्सिटीतर्फे क्रीडा क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आजी-माजी खेळाडूंचा डॉक्टरेट पदवी देऊन सत्कार करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये ऑलिम्पियन बॉक्सर मेरी कोमचाही समावेश होता. मात्र सचिनने ही पदवी स्विकारणं नैतिकतेला धरुन नसल्याचं कारण देत युनिव्हर्सिटीला नकार कळवला आहे.

जाधवपूर युनिव्हर्सिटीचे कुलगुरु सुरंजन दास यांनी प्रसारमाध्यमांना यासंदर्भातली माहिती दिली. “आम्ही यासंदर्भात सचिनले इ-मेल करुन त्याची वेळ मागितली होती. मात्र आम्हाला आलेल्या उत्तरामध्ये सचिनने ही पदवी स्विकारण्यास नकार दिला आहे. आपण कोणत्याही युनिव्हर्सिटीकडून पदवी स्विकारत नसल्याचं सचिनने स्पष्ट केलंय. याआधी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडून देण्यात आलेल्या पदवीचा स्विकार करण्यास सचिनने नकार दर्शवला होता. अशाप्रकारे डॉक्टरेट पदवी स्विकारणं नैतिकतेला धरुन नसल्याचं सचिनने आपल्या उत्तरात म्हटलं आहे.”

अवश्य वाचा – ४ तासांत २ किलो वजन घटवून मेरी कोमने सुवर्णठोसा लगावला

सचिनने नकार दर्शवल्यानंतर जाधवपूर युनिव्हर्सिटीने मेरी कोमचा डॉक्टरेट पदवी देऊन सत्कार करण्याचं ठरवलं आहे. बॉक्सिंगमध्ये मेरी कोमने पाचवेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. २०१४ साली झालेल्या आशियाई खेळांसह २०१८ सालातील राष्ट्रकुल स्पर्धेतही मेरी कोमने सुवर्णपदकाची कमाई केली होती. मेरी कोम व्यतिरीक्त टाटा मेडिकलचे डॉक्टर मामेन चंडी, अर्थतज्ञ कौशिक बसू, बँकर चंद्रशेखर घोष यांचाही डॉक्टरेट पदवी देऊन गौरव करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sachin tendulkar refuses doctorate degree from jadavpur university

ताज्या बातम्या