दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागलं आहे. आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथने, विराट भारतासाठी दीर्घ काळ भारतीय संघाचा कर्णधार राहु शकेल की नाही यावर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. ESPNCricinfo या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत स्मिथने आपलं मत मांडलं.

“या वर्षाच्या अखेरपर्यंत विराट कोहली भारताबाहेर मालिका खेळणार आहे. भारतीय वातावरणात खेळताना गोष्टी तुम्हाला फायदेशीर ठरतात. मात्र परदेशात संघ खडतर परिस्थितीमधून जात असताना, विराटवर जे दडपण येणार आहे त्याचा विचार केला असता दीर्घ काळ तो भारताचा कर्णधार राहील याची खात्री देता येत नाही.” आपल्या खेळाचा किंवा मैदानातील वागणुकीचा आपल्या संघातील इतर खेळाडूंवर कसा परिणाम पडतोय याकडेही विराटने लक्ष देणं गरजेचं असल्याचं, स्मिथने स्पष्ट केलं.

“एक खेळाडू म्हणून विराट कोहलीच्या क्षमतेवर कोणालाही शंका नाही आहे. त्याच्यातली आक्रमकता त्याचा खेळ आणखीन बहरण्यास नेहमी मदत करत आलेली आहे. मात्र मैदानात काहीवेळा विराट विनाकारण आक्रमक होतो. त्याच्या या वागणुकीचा संघातील इतर सहकाऱ्यांवर परिणाम होतो. एक कर्णधार म्हणून या गोष्टींमध्ये सुधारण्यासाठी विराट कोहलीला अजून खूप वाव आहे. कर्णधाराच्या आक्रमकतेचा इतक सहकाऱ्यांवर कधीकधी नकारात्मक परिणाम होऊ शकतो.”

पहिल्या दोन कसोटी गमावल्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली तिसरी आणि अखेरची कसोटी २४ जानेवारीपासून जोहान्सबर्गच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. ३ कसोटी सामन्यांची मालिका भारताने गमावल्यामुळे अखेरच्या सामन्यात भारत नेमक्या कोणत्या खेळाडूला संघात स्थान देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.