वेगवान गोलंदाजीने आपली दहशत निर्माण करणारा, भल्या भल्या फलंदाजांना धडकी भरवणारा, रिव्हर्स स्विंगची कला दाखवणारा भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज झहीर खानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. दुखापतींनी पिच्छा पुरवल्यामुळे पूर्वीसारखी गोलंदाजी करता येणार नसल्याचे जाणवल्याने निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे झहीरने सांगितले.

कपिल देव व जवागल श्रीनाथ यांच्यानंतर झहीर हा भारताला मिळालेला तिसरा यशस्वी वेगवान गोलंदाज ठरला. ३७ वर्षीय झहीरने ९२ कसोटी सामन्यांमध्ये ३११ बळी मिळवले. तसेच २०० एकदिवसीय सामन्यांमध्ये २८२ फलंदाजांना बाद करण्याची किमया साधली. याचप्रमाणे १७ ट्वेन्टी-२० सामनेही तो भारताकडून खेळला.
‘‘प्रत्येक खेळाडूला निवृत्तीचा निर्णय घेणे कठीण असते. अजून काही सामने खेळण्याची इच्छा होती. पण गेल्या २० वर्षांच्या गोलंदाजीनंतर बऱ्याच दुखापती झाल्या. शरीर योग्य साथ देत नव्हते. सचिन तेंडुलकर आणि अन्य खेळाडूंशी चर्चा करून मी अखेर निवृत्तीचा निर्णय घेतला आहे,’’ असे झहीरने सांगितले.
तो पुढे म्हणाला की, ‘‘विश्वचषक जिंकणे ही एक ऐतिहासिक गोष्ट होती. भारतीय संघात आल्यापासून मला बऱ्याच जणांनी सहकार्य केले, त्या सर्व व्यक्तींचे, संघांचे, संघटनांचे मी आभार मानू इच्छितो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतर आता आयपीएलच्या तयारीला सुरुवात करणार आहे.’’

कसोटी एकदिवसीय

सामने ९२ २००
डाव १६५ १९७
चेंडू १८७८५ १००९७
धावा १०२४७ ८३०१
बळी ३११ २८२
सर्वोत्तम (डावात) ७/८७ ५/४२
सर्वोत्तम (सामना) १०/१४९ ५/४२
सरासरी ३२.९४ २९.४३

’ जन्म : ७ ऑक्टोबर १९७८
’ निवास : श्रीरामपूर, महाराष्ट्र
’ संघ : भारत, आशिया इलेव्हन, बडोदा, दिल्ली डेअरडेव्हिल्स, मुंबई, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सरे, वॉर्कीस्टरशायर.
’ भूमिका : गोलंदाज
’ गोलंदाजीची शैली : डावखुरा वेगवान गोलंदाज.
’ फलंदाजीची शैली : उजव्या हाती

’ कसोटी पदार्पण
बांगलादेश विरुद्ध, ढाका,
१० ते १३ नोव्हेंबर २०००
’ एकदिवसीय पदार्पण
केनिया विरुद्ध, नैरोबी,
३ ऑक्टोबर २०००
’ ट्वेन्टी-२० पदार्पण
दक्षिण आफ्रिका विरुद्ध, जोहान्सबर्ग,
१ डिसेंबर २००६