लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर रंगलेल्या चौथ्या कसोटीत भारताने इंग्लंडला हरवत दैदिप्यमान कामगिरी केली. भारताचा पहिला डाव १९१ धावांवर आटोपला, मात्र दुसऱ्या डावात विराटसेनेने ४६६ धावा केल्या आणि इंग्लंडसमोर तगडे आव्हान ठेवले. इंग्लंडला हे आव्हान मात्र पेलवले नाही. तब्बल ५० वर्षांनी भारताने ओव्हलवर कसोटी जिंकली. ऐतिहासिक कामगिरीनंतर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी भारताच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. खरे तर १० दिवसांपूर्वीच त्यांना भारताच्या कमबॅकबद्दल ट्वीट केले होते.

या विजयासह भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. लीड्स कसोटीत भारताचा पहिला डाव ७८ धावांवर आटोपला. त्यानंतर इंग्लंडने भारतासमोर ४३२ धावा केल्या. इंग्लंडने दिलेले आव्हान भारताला दुसऱ्या डावात पेलले नाही आणि भारताने ही कसोटी ७६ धावांनी गमावली. ७८ धावांच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर टीम इंडियावर टीका करण्यात येत होती. तेव्हा महिंद्रांनी ”टीम इंडियाच्या मागे उभे राहण्याची ही वेळ आहे, खेळ हा रोलर कोस्टरसारखा आहे, म्हणून आपण राइडला जाण्यासाठी सज्ज असले पाहिजे. आपण मोठ्या कमबॅकसाठी उत्सुक आहोत”, असे ट्वीट केले होते.

हेही वाचा – सामनावीर ठरलेल्या रोहितचं शार्दुलबाबतचं मत ऐकून तुम्हीही म्हणाल, “एकच हृदय किती वेळा जिंकशील रे!”

आता ओव्हल कसोटी जिंकल्यानंतर महिंद्रांनी आपले हेच जुने ट्वीट रिट्वीट करत एक नवीन ट्वीट केले आहे. नव्या ट्वीटमध्ये ते म्हणाले, ”आणि हे कमबॅक आत्मविश्वास आणि आक्रमकतेचे प्रदर्शन होते. तुमच्यावरील आमच्या विश्वासाची परतफेड केल्याबद्दल धन्यवाद. या रोलर कोस्टर राइडवर आम्ही तुमच्या शेजारीच अभिमानाने बसतो!”

 

यापूर्वी ओव्हलवर भारत

या सामन्यापूर्वी ओव्हल मैदानावर टीम इंडियाला गेल्या ५० वर्षात एकही कसोटी सामना जिंकता आलेला नव्हता. भारताने १९३६ ते २०१८ या काळात १३ कसोटी सामने या मैदानावर खेळले आहेत. त्यापैकी ५ मध्ये त्यांचा पराभव झाला होता. ७ सामने भारताने गमावले होते, तर फक्त एका सामन्यात विजय मिळवला होता. या मैदानावर १९७१ साली भारताने एकमेव आणि अखेरचा विजय मिळवला होता.