इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळही अंधुक प्रकाशामुळे थांबवण्यात आला आहे. पहिल्या डावात कर्णधार जेसन होल्डर आणि शेनॉन गॅब्रिअल यांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा डाव २०४ धावांत आटोपला. होल्डरने ६ तर गॅब्रिअलने ४ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल विंडीजच्या फलंदाजांनी डावाची सुरुवात चांगली केली होती. क्रेग ब्रेथवेट आणि जॉन कॅम्पबेल यांच्यात पहिल्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारीही झाली. विंडीजने अर्धशतकी धावसंख्या गाठल्यानंतर पंचांनी अंधुक प्रकाशामुळे दिवसाचा खेळ थांबवला.

त्याआधी, वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर आणि त्याचा साथीदार शेनॉन गॅब्रिअल यांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने आश्वासक कामगिरी केली. कर्णधार जेसन होल्डरने विंडीजच्या डावाला खिंडार पाडत ६ बळी घेतले. त्याला गॅब्रिअलने ४ बळी घेत चांगली साथ दिली. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्स, जोस बटलर आणि सलामीवीर रोरी बर्न्स यांनी चांगली झुंज दिली. परंतू विंडीजच्या गोलंदाजांसमोर त्यांची डाळ शिजू शकली नाही.

उपहाराच्या सत्रापर्यंत इंग्लंडने ५ गड्यांच्या मोबदल्यात १०६ धावांपर्यंत मजल मारली होती. सलामीच्या फलंदाजांनी निराशा केल्यानंतर बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांनी इंग्लंडचा डाव सावरला. या फलंदाजांनी केलेल्या भागीदारीमुळेच इंग्लंडने आश्वासक धावसंख्येचा टप्पा गाठला. मात्र उपहारानंतर जेसन होल्डरने स्टोक्स आणि बटलरची जोडी फोडत इंग्लंडला धक्का दिला. इंग्लंडच्या अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी विंडीज गोलंदाजांचा फारसा सामना करण्याची तसदी घेतली नाही. अखेरीस २०४ धावांवर इंग्लंडचा पहिला डाव संपुष्टात आला. कर्णधार म्हणून होल्डरने या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी केली.

त्याआधी, १ बाद ३५ वरुन इंग्लंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु केला. गॅब्रिअलने आपला भेदक मारा सुरु ठेवत जो डेनली आणि रोरी बर्न्स यांना माघारी धाडलं. लागोपाठ बसलेल्या धक्क्यांमुळे इंग्लंडचा संघ बॅकफूटवर ढकलला गेला. यानंतर झॅक क्रॉली आणि कर्णधार बेन स्टोक्स यांनी छोटेखानी भागीदारी रचत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्णधार होल्डरने क्रॉली आणि पोप यांना झटपट माघारी धाडत इंग्लंडला पुन्हा एकदा बॅकफूटवर ढकललं. बेन स्टोक्स आणि जोस बटलरने उरलेल्या सत्रातील षटकं खेळून काढत संघाची अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली. दोन्ही फलंदाजांनी इंग्लंडला शंभर धावांचा पल्ला ओलांडून दिला.