करोनाच्या दणक्याने क्रीडा विश्व गेले तीन-चार महिने ठप्प होतं. काही दिवसांपूर्वी बंडसलिगा, ला लिगा या फुटबॉलच्या स्पर्धा सुरू झाल्या. त्या पाठोपाठ अनेक क्रीडा स्पर्धा आता सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. आजपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचेदेखील मैदानावर पुनरागमन होत आहे. इंग्लंडच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरोधात आजपासून कसोटी मालिका रंगणार आहे. करोनाचा धोका लक्षात घेत ICC ने घालून दिलेल्या नव्या नियमावलीनुसार हे सामने खेळवले जाणार आहेत. या सामन्यातील महत्त्वाचे खेळाडू कोणते? काय गोष्टींकडे विशेष लक्ष असावं? अशा विविध विषयांवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि महान फलंदाज ब्रायन लारा या दोघांनी व्हिडीओ कॉलवरून चर्चा केली. लाराने त्याच्या व्हिडीओ शेअर केला आहे.

पाहा तो व्हिडीओ –

सामन्याबद्दल थोडंसं…

करोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास तीन महिन्यांहून अधिक काळ स्थगित झालेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुधवारपासून सुरू होत आहे. जैवसुरक्षित स्टेडियमवर इंग्लंड संघ पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजशी सामना करणार आहे. बेन स्टोक्स आणि जेसन होल्डर हे अनुक्रमे इंग्लंड आणि विंडीजचे कर्णधार करोनाचे आव्हान पेलत संघाला सज्ज करीत आहेत. बंदिस्त स्टेडियमवर प्रेक्षकांविना होणाऱ्या या सामन्याचा आनंद क्रिकेटरसिकांना मात्र टेलिव्हिजनवरच लुटता येणार आहे. या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) करोना कालखंडासाठीचे विशेष नियम राबवणार आहेत. गोलंदाजांना चेंडूला लाळेचा वापर करता येणार नाही.

इंग्लंडचा संघ – बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), झॅक क्रॉली, जोए डेनली, ऑली पोप, डॉम सिबले, ख्रिस वोक्स, मार्क वूड

वेस्ट इंडिजचा संघ – जेसन होल्डर, क्रेग ब्रेथवेट, शाई होप, शेन डॉरिच, रोस्टन चेस, शेमार ब्रूक्स, रहकीम कॉर्नवॉल, एन्कुरमा बोनेर, अल्झारी जोसेफ, चेमार होल्डर, जॉन कँपबेल, रेमॉन रेफर, केमार रोच, जेर्मिन ब्लॅकवूड, शॅनॉन गॅब्रियल

कसोटी मालिकेचं वेळापत्रक –

८ ते १२ जुलै – पहिली कसोटी (Ageas Bowl)
१६ ते २० जुलै – दुसरी कसोटी (Old Trafford)
२४ ते २८ जुलै – तिसरी कसोटी (Old Trafford)