माजी क्रिकेटपटू   मत

मुंबई : इंग्लंडमध्ये ३० मेपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत फलंदाजांना खेळपट्टीकडून अधिक मदत मिळेल, परंतु चेंडूला स्विंग करण्यासाठी गोलंदाजांना मेहनत करावी लागेल, अशी प्रतिक्रिया माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने व्यक्त केली.

वांद्रे येथील एमआयजी क्रिकेट क्लबच्या पॅव्हेलियनला गुरुवारी सचिन तेंडुलकरचे नाव देण्यात आले. यावेळी सचिन म्हणाला, ‘‘इंग्लंडमध्ये यंदा कडक ऊन असेल, असे मला सांगण्यात आले आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतदेखील सूर्यप्रकाशाच्या वेळी फलंदाजांना फलंदाजी करणे अधिक सोपे जात होते. त्यामुळे यावेळीसुद्धा फलंदाजांनाच पोषक खेळपट्टय़ा बनवल्या जातील.’’

‘‘कोणत्याही प्रकारात दमदार कामगिरी केल्याचा फायदा खेळाडूला होतो. विश्वचषकापूर्वी खेळाडूंना तेथील वातावरणाशी जुळवून घेण्याची भारताला चांगली संधी आहे. त्याशिवाय भारतीय संघातील बहुतांश खेळाडूंना इंग्लंडच्या खेळपट्टय़ांवर खेळण्याची सवय असल्याने भारत विश्वचषकात नक्कीच चमकदार खेळ करेल,’’ असेही ४६ वर्षीय सचिनने सांगितले.

जेव्हा सचिन आणि अजित आमने-सामने येतात!

सचिनने यावेळी त्याचा मोठा भाऊ अजित तेंडुलकरसोबतचा एक किस्साही सर्वाना सांगितला. एमआयजी क्रिकेट क्लबच्या खास आठवणीविषयी विचारले असता सचिन म्हणाला, ‘‘एमआयजीवर ज्यावेळी ‘एकेरी विकेट’चे सामने व्हायचे, त्यावेळी एके वर्षी मी व अजितनेसुद्धा सहभाग नोंदवला होता. मात्र आम्हा दोघांनाही याविषयी कल्पना नव्हती. अखेरीस उपांत्य फेरीत आम्ही एकमेकांविरुद्ध आलो आणि कारकीर्दीत पहिल्यांदाच मला माझ्या भावाने जिंकावे आणि मी हरावे, असे वाटत होते.’’