इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये आघाडीवर असलेल्या एव्हर्टनची विजयाची मालिका रविवारी मध्यरात्री खंडित झाली. लुसाक डिगने याला दुसऱ्या सत्रात लाल कार्ड दाखवल्यानंतर एव्हर्टनला साऊदम्प्टनकडून ०-२ असे पराभूत व्हावे लागले. त्यांचा हा यंदाच्या मोसमातील पहिला पराभव ठरला.

जेम्स वार्ड-प्रावसेने २७व्या मिनिटाला साऊदम्प्टनचे खाते खोलले. मग त्याने ३५व्या मिनिटाला छे अ‍ॅडम्सकडे चेंडू सोपवला. अ‍ॅडम्सने या संधीचे सोने करत दुसरा गोल लगावून साऊदम्प्टनला विजय मिळवून दिला. एव्हर्टनची या मोसमातील खराब कामगिरी ठरली. त्यांच्या डिगनेला ७१व्या मिनिटाला पंचांनी लाल कार्ड दाखवले. तरीही एव्हर्टनने १३ गुणांसह अग्रस्थान कायम राखले आहे. अन्य सामन्यांत, जेम्स वार्डीच्या गोलमुळे लिसेस्टर सिटीने आर्सेनलसारख्या बलाढय़ संघावर १-० असा विजय मिळवत गुणतालिकेत १२ गुणांनिशी चौथे स्थान पटकावले. वार्डीचा हा आर्सेनलविरुद्धचा ११वा गोल ठरला.

युव्हेंटसची वेरोनाशी बरोबरी

सेरी-ए फुटबॉल स्पर्धा

करोनाग्रस्त असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोशिवाय खेळणाऱ्या युव्हेंटसला रविवारी मध्यरात्री सेरी-ए फुटबॉल स्पर्धेत वेरोनाविरुद्ध १-१ अशी बरोबरी पत्करावी लागली. त्यामुळे युव्हेंटसची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. आंद्रिया फॅव्हिलीने ६०व्या मिनिटाला वेरोनाला आघाडी मिळवून दिल्यानंतर देजान कुलुसेवास्कीच्या गोलमुळे युव्हेंटसने ७७व्या मिनिटाला बरोबरी साधली.

रेयाल सोसिएदाद अग्रस्थानी

ला-लीगा फुटबॉल

रेयाल सोसिएदादने ह्य़ूएस्का संघाचा ४-१ असा पाडाव करत ला-लीगा फुटबॉलच्या अग्रस्थानी झेप घेतली. मिकेल ओयारझबालचे दोन गोल तसेच पोर्टू आणि अलेक्झांडर इसाक यांनी सोसिएदादला विजय मिळवून दिला. या विजयासह सोसिएदादने रेयाल माद्रिदला एका गुणाने मागे टाकत १४ गुणांनिशी अग्रस्थान मिळवले.

लिलेने अग्रस्थान गमावले

फ्रेंच-१ लीग फुटबॉल

लिले संघाने फ्रेंच-१ लीगमधील अपराजित राहण्याची मालिका कायम राखली असली तरी त्यांना अग्रस्थान गमवावे लागले आहे. लिलेला नीसविरुद्ध १-१ अशी बरोबरी पत्करावी लागली. पॅरिस सेंट जर्मेनने डिजॉनचा ४-० असा धुव्वा उडवत अग्रस्थानी मजल मारली. किलियन एम्बाप्पे आणि मोइस कीइन यांनी प्रत्येकी दोन गोल केले.