इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉलमध्ये शनिवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात गतविजेत्या लिव्हरपूलने आर्सेनलचा ३-० असा पराभव करून दमदार विजयाची नोंद केली.

त्यांच्या जेतेपदाच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या असल्या तरी त्यांनी अव्वल चार संघांतील स्थानासाठी दावेदारी पेश केली आहे.  दिएगो जोटाने अनुक्रमे ६४व्या आणि ८२व्या, तर मोहम्मद सलाहने ६८व्या मिनिटाला एक गोल झळकावून लिव्हरपूलचा विजय पक्का केला.

मँचेस्टर सिटीची जेतेपदाकडे वाटचाल

लिस्टर : गुणतालिकेत अग्रस्थानी विराजमान असलेल्या मँचेस्टर सिटीने लिस्टर सिटीवर २-० अशी मात करताना प्रीमियर लीग जेतेपदाच्या दिशेने कूच केली. बेंजामिन मेंडी (५८वे मिनिट) आणि गॅब्रिएल जिजस (७४) यांनी सिटीसाठी प्रत्येकी एक गोल केला. सिटीच्या नावावर ३१ सामन्यांतून सर्वाधिक ७४ गुण जमा असून दुसऱ्या क्रमांकावरील मँचेस्टर युनायटेडपेक्षा (२९ सामन्यांत ५७ गुण) ते तब्बल १७ गुणांनी आघाडीवर आहेत.