युरो चषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत यजमान फ्रान्सने आईसलँडचा ५-२ असा धुव्वा उडवून उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत फ्रान्ससमोर विश्वविजेत्या जर्मनीचे आव्हान असणार आहे. फ्रान्सने आईसलँडविरुद्धच्या सामन्यात सुरूवातीपासूनच वर्चस्व गाजवले.

फ्रान्सकडून ऑलिव्हियर जिरुडने १२ व्या मिनिटाला गोल करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर सामन्याच्या पॉल पोग्बाने १९ मिनिटाला दुसरा आणि दिमित्री पायेटने ४२ व्या मिनिटाला तिसरा गोल करून सामन्यावर पकड निर्माण केली. अँटोनियो ग्रिझमनने ४५ मिनिटाला आणखी एक गोल करून ४-० अशी आघाडी घेऊन युरो चषकात पदार्पण केलेल्या आईसलँडला धक्का दिला.

दुसऱया हाफमध्ये आईसलँडनेही कडवी झुंझ दिली. सिगथॉरसने सामन्याच्या ५६ व्या मिनिटाला गोल करून आईसलँडचे खाते उघडले. पण फ्रान्सच्या जिरूडने आणखी एक गोल करून फ्रान्सची आघाडी ५-१ अशी वाढवली. आईसलँडने अखेरच्या मिनिटापर्यंत लढा दिला. सामन्याच्या ८४ मिनिटाला आईसलँडकडून जार्नसन याने गोल डागला. ९० मिनिटांचा खेळ संपुष्टात आला त्यावेळी यजमानने फ्रान्सने ५-२ अशी लढाई जिंकली होती.