करोना विषाणूची लागण झालेले भारतीय संघाचे माजी खेळाडू चेतन चौहान यांची प्रकृती खालावली आहे. चेतन चौहान यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या चौहान यांना व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत असलेल्या चौहान यांना जुलैमध्ये करोनाची लागण झाली होती. यानंतर उपचारासाठी ते लखनऊ येखील एका रुग्णालयात दाखल झाले.

मात्र यानंतर चौहान यांना उच्च रक्तदाब आणि किडनीचा त्रास व्हायला लागल्यानंतर त्यांना तात्काळ गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आलं. डॉक्टर चौहान यांच्या प्रकृतीवर नजर ठेवून आहेत. दोनवेळा माजी खासदार म्हणून काम केलेले चेतन चौहान सध्या उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम करत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९७० च्या काळात चेतन चौहान आणि सुनिल गावसकर यांची जोडी विशेष गाजली होती. १९६९ ते १९७८ या काळात चौहान यांनी भारतीय संघाकडून ४० कसोटी सामने खेळले.

उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत आहेत चेतन चौहान

 

गावसकर यांच्यासोबत चेतन चौहान यांनी १० शतकी भागीदाऱ्या केल्या आहेत. तसेच या जोडीच्या नावावर ३ हजार धावाही जमा आहेत. याव्यतिरीक्त स्थानिक क्रिकेटमध्येही चेतन चौहान यांनी दिल्ली आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व केलं आहे. १९८१ साली चौहान यांना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.