इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) वाद टाळण्यासाठी कोणती पावले उचलता येतील, यावर सध्या मुंबईत सुरू असलेल्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत खलबते सुरू आहेत. आयपीएलच्या पुढील पर्वात ‘नो-बॉल’ तपासण्यासाठी अतिरिक्त पंच ठेवावा, यावर ‘गव्हर्निंग कौन्सिल’चे विचारमंथन सुरू आहे. गेल्या काही मोसमांमध्ये पंचांनी दिलेल्या ‘नो-बॉल’च्या निर्णयामुळे अनेक वादविवाद घडले होते. त्यामुळे भारतीय सामनाधिकाऱ्यांच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळेच गोलंदाजाचा पुढचा पाय रेषेच्या पुढे पडतो का? आणि गोलंदाजाने टाकलेला फुलटॉस चेंडू कमरेच्या वर तर नाही ना? हे तपासण्यासाठी आता अतिरिक्त पंच नेमण्यात येणार आहे. याच मुद्दय़ावर मंगळवारी बरीच चर्चा करण्यात आली.

माजी कसोटीपटू ब्रिजेश पटेल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीत भारतीय संघाचे पुढील वेळापत्रक, परदेशी खेळाडूंची उपलब्धता तसेच परदेशात मैत्रीपूर्ण सामने खेळण्यासाठी फ्रँचायझी कितपत उत्सुक आहेत, यावर चर्चा करण्यात आली. कोणत्याही क्षणी मैदानात बदली खेळाडू उतरवण्याची ‘पॉवर-प्लेयर’ ही संकल्पना वेळेअभावी आयपीएलच्या पुढील मोसमात वापरण्यात येणार नाही.

‘‘सर्व काही सुरळीत घडले तर पुढील मोसमात नियमित पंचांसोबत फक्त ‘नो-बॉल’ तपासण्यासाठी आणखी एक पंच नियुक्त करण्यात येईल. ही संकल्पना ऐकण्यासाठी काहीशी विचित्र वाटत असली तरी या प्रमुख मुद्दय़ावर बराच विचारविनिमय करण्यात आला,’’ असे गव्हर्निंग कौन्सिलच्या एका वरिष्ठ सदस्याने सांगितले.

‘‘तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची आमची इच्छा आहे. फक्त नो-बॉल तपासण्यासाठी आम्ही अतिरिक्त पंच ठेवणार आहोत. हे काम तिसरा किंवा चौथा पंच पाहणार नाही,’’ असेही त्यांनी सांगितले. एखाद्या देशांतर्गत स्पर्धेमध्ये या नव्या संकल्पनेचा अवलंब केल्यानंतरच आयपीएलमध्ये अतिरिक्त पंच नेमावा की नाही, याविषयी अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

आयपीएलच्या गेल्या मोसमात ‘नो-बॉल’च्या निर्णयावरून बरेच वाद उद्भवले होते. मुंबई इंडियन्सच्या लसिथ मलिंगाने टाकलेला चेंडू ‘नो-बॉल’ असतानाही पंचांचे त्याकडे लक्ष नसल्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचा कर्णधार विराट कोहली आणि भारतीय पंच एस. रवी यांच्यात बरीच बाचाबाची झाली होती. या निर्णयाचा फटका बेंगळूरुला बसला होता.