16 December 2017

News Flash

‘थर’थराट!

वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ ही म्हण अपार मेहनतीसंदर्भात नेहमीच वापरली जाते. मात्र मारुती-सुझुकी

पराग फाटक - parag.phatak@expressindia.com | Updated: February 28, 2013 1:30 AM

वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ ही म्हण अपार मेहनतीसंदर्भात नेहमीच वापरली जाते. मात्र मारुती-सुझुकी डेझर्ट स्टॉर्मनिमित्ताने या म्हणीचा प्रत्यय आला. अथांग पसरलेल्या वाळूच्या साम्राज्याला पार करत रॅलीपटूंनी अंतिम लक्ष्य गाठले. सहा दिवस वाळूवर चाललेल्या या द्वंद्वात रॅलीपटूंनी आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली. मोटारस्पोर्ट्स हा देशभरात हळूहळू प्रसार होत असलेला खेळ. आर्थिक क्षमता भक्कम हा मुख्य निकष असल्याने खेळाचा प्रचार कॉर्पोरेट, व्यावसायिक, सेलिब्रेटी यांच्यापुरताच मर्यादित आहे. मात्र सध्या आयटी-अभियांत्रिकी या क्षेत्रांमध्ये पगारामधील शून्यांची संख्या वाढत असल्याने वेगाची झिंग असणाऱ्या मंडळींनी या खेळाला आपलेसे करायला सुरुवात केली आहे. देशातील मोटारस्पोर्ट्स स्पर्धापैकी एक असलेल्या डेझर्ट स्टॉर्मचा थरार नुकत्याच राजस्थानमधील थरच्या वाळवंटात रंगला. कशी असते नक्की ही रॅली, काय प्रकार असतात, काय अडथळे येतात याचा थेट राजस्थानमधून दिलेला ‘आँखो देखा हाल’ रंजक असाच आहे. मारुती-सुझुकीतर्फे वर्षांतून चार रॅलींचे आयोजन होते. यापैकी रेड दी हिमालय लेह-लडाखच्या अवघड परिसरात होते. निसर्गाच्या प्रतिकूलतेशी झुंज देत रॅलीपटूंना लक्ष्य गाठायचे असते. याच्या अगदी विरुद्ध म्हणजे वाळवंटात उष्ण वातावरणात डेझर्ट स्टॉर्मचा थरार रंगतो. याव्यतिरिक्त दक्षिण डेअर ही रॅली दक्षिणेमधील नागमोडी वळणांच्या पर्वतराजीत होते. याशिवाय ऑटो क्रॉस ही रॅली होते.
रॅलीमध्ये चार गट निश्चित करण्यात आले आहेत. एन्डय़ुरो, एक्सप्लोर, मोटोक्वॉड्स आणि एक्स्ट्रीम. नावाप्रमाणेच रस्ते, चढउतार, हवामान या सगळ्यांमधील एक्स्ट्रीम परिस्थितीवर मात करून यांना रॅली पूर्ण करायची असते. मोटोक्वॉड वगळता अन्य गटातील रॅलीपटूंना नेव्हिगेटरची साथ मिळते. पुढे रस्ता कसा आहे, कुठे वळण घ्यायचे आहे, कुठे खड्डा चुकवायचा आहे. या सगळ्याची अक्षरश: क्षणाक्षणाला माहिती नेव्हिगेटर देतो. त्याच्याकडे सुरू असलेल्या टप्प्याटप्प्याचा कागदी नकाशा असतो. याशिवाय गाडीत बसवलेल्या जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) आधारे तो चालकाला मार्गदर्शन करतो. ताशी १२०-१४० च्या वेगाने गाडी पळत असल्याने चालकाला तांत्रिक गोष्टीत लक्ष देणे शक्यच नसते, त्यामुळे नेव्हिगेटरची भूमिका निर्णायक असते. रॅलीत भाग घेण्यासाठी वयाचे बंधन नसते, तसेच पुरुष-स्त्री असाही भेद नसतो. वेगाची आवड आणि आर्थिकदृष्टय़ा सुदृढ असणारे कोणीही रॅलीत सहभागी होऊ शकतात. अव्वल रॅलीपटूंना कारविक्रेत्या कंपन्या करारबद्ध करतात. अन्य रॅलीपटूंना स्वबळावरच सहभागी व्हावे लागते. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्कच ९०,००० हजार रुपये आहे आणि गाडीच्या देखभालीसाठी, इंधनासाठी असे सगळे मिळून रॅलीसाठी येणारा खर्च काही लाखांमध्ये जातो. ही रॅली सुरळीतपणे व्हावी यासाठी सव्र्हिस अर्थात मदत यंत्रणा तत्पर असते. गाडीत तांत्रिक बिघाड किंवा अपघात झाल्यास, रॅलीपटूंना शारीरिक इजा झाल्यास अवघ्या काही मिनिटांत ही मंडळी घटनास्थळी पोहोचतात. रॅलीपटूंच्या जिवाला कोणताही धोका पोहोचू नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जाते. याव्यतिरिक्त रॅलीपटूंच्या वेळेची नोंद ठेवण्यासाठी स्वयंसेवकांची फौज तैनात असते.
रॅलीपटूंची मुख्य स्पर्धा अंतर्गत भागात, दुर्गम परिसरात, वाळवंटात होते. मात्र त्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी रॅलीपटू नेहमीच्या रस्त्याचा उपयोग करतात. या टप्प्याला ‘ट्रान्स्पोर्ट लेग’ म्हणतात. नेहमीच्या रस्त्यावरून अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ रॅलीच्या वेळेत नोंदला जात नाही. एरव्ही शर्यतींमध्ये अव्वल स्थान पटकावणे हेच ईप्सित असते. रॅलीमध्येही अव्वल स्थान मिळवणे हे ध्येय असतेच, मात्र त्यापेक्षा रॅली सुरक्षितपणे पूर्ण करण्याला अधिक महत्त्व असते. सहा दिवसांत ‘तहान-भूक-झोप’ या कशाचीही पर्वा न करता प्रतिकूल वातावरणात रॅलीचे अंतिम टप्पा गाठणे हे खरेच जिकरीचे आहे. यंदा सुमारे दीडशे रॅलीपटूंनी एक्स्ट्रीम विभागात सुरुवात केली. मात्र जयपूपर्यंत अर्थात रॅलीच्या पूर्णबिंदूपर्यंत ८६ जणच पोहोचू शकले.
१८ फेब्रुवारीला सोमवारी दिल्लीत औपचारिकरीत्या रॅलीला सुरुवात झाली. यानंतर रॅलीपटूंनी दहा तासांत ३५० किमीचे अंतर पार करत सरदारशहर गाठले. या छोटय़ाशा शहराच्या नजीकच असलेल्या वाळवंटात रात्रीच्या टप्प्याने रॅलीची सुरुवात झाली. गेल्या वर्षीच्या रॅलीनंतर झालेल्या या महत्त्वपूर्ण बदलाने रॅलीपटूंची परीक्षा पाहिली. अंतर कमी असले तरी गडद अंधार, सभोवताली पसरलेली वाळू यामुळे अनेक रॅलीपटूंना हा टप्पा पार करताना अडचणी आल्या. यानंतर दुसऱ्या दिवशी सरदारशहर ते बीकानेर या दरम्यानच्या विविध गावांच्या परिसरात रॅलीपटूंनी तूफान वेगाने गाडय़ा हाकत गावकऱ्यांना अचंबित केले. विजेसारख्या मूलभूत सोयीपासून वंचित आणि ऊंट हेच वाहतुकीचे मुख्य माध्यम असलेल्या गावकऱ्यांनी रॅलीचा थरार अनुभवण्यासाठी एकच कल्ला केला. उंचसखल प्रदेशामुळे चार गाडय़ांमध्ये तांत्रिक बिघाड उद्भवला आणि त्यांना माघार घ्यावी लागली.
यानंतर गाडय़ांचा काफिला जैसलमेरच्या दिशेने रवाना झाला. गिरान्डी आणि पाबूसर या अतिदुर्गम भागातून रखरखीत वातावरणामधून रॅलीपटूंनी आगेकूच केली. यानंतर जैसलमेरनजीकच्या सँड डय़ून्स या वाळवंटी टेकडय़ांमध्ये आणखी दोन टप्पे झाले. यानंतर पुन्हा रॅलीचा ताफा बीकानेरच्या दिशेने रवाना झाला. नोखरा-कांजी की सर्द आणि बाप रेल्वेस्थानकानजीकच्या टप्प्यांत रॅलीपटूंमध्ये प्रचंड चुरस पाहायला मिळाली. जयपूरच्या दिशेने अंतिम टप्प्याच्या वेळी पावसाचे आगमन झाले. यामुळे रॅलीपटूंना वेगावर नियंत्रण आणावे लागले. एकूण तेरा टप्प्यांपैकी आठमध्ये अव्वल स्थान मिळवणाऱ्या सुरेश राणाने एक्स्ट्रीम गटाच्या अव्वल स्थानावर कब्जा केला.

First Published on February 28, 2013 1:30 am

Web Title: fear factor
टॅग Fear Factor,Sports