‘’आज नडालशी खेळताना मी हरलो असतो तरी चाललं असतं मला’’

आॅस्ट्रेलियन ओपनचं अजिंक्यपद मिळवल्यावर टेनिसच्या सम्राटाची ही प्रतिक्रिया खूपच बोलकी होती. कितीतरी दुखापतींचा सामना करून आंतराष्ट्रीय टेनिसमध्ये धडाक्यात पुनरागमन करणाऱ्या राफाएल नडालच्या कौशल्याला राॅजर फे़डररने केलेला तो सलामच होता.

“टेनिस हा खूपच कठीण खेळ आहे. त्यात हार किंवा जीत हे दोनच मार्ग असतात ड्राॅ हा प्रकार असता तर आज मी नडालविरोधात तोही स्वीकारला असता.”

स्पर्धेचं अजिंक्यपद हातात असतानाही एवढी संयत आणि प्रतिस्पर्ध्याचा आदर करणारी प्रतिक्रिया देणारा फेडरर म्हणूनच जेंटलमन प्लेअर म्हणून ओळखला जातो.

ही काही खोटी स्तुती नाही, जे मनात तेच शब्दात आणि कृतीत ठेवणारा राॅजर आपल्या भावना मुक्तपणे व्यक्त करतो. आज आॅस्ट्रेलिय़न ओपन जिकल्यावर त्याच्या डोळ्यात आलेले अश्रूही त्याने मुक्तपणे वाहू दिले. त्यावेळी आपण टेनिसचे चॅम्पियन आहोत,कसं दिसेल वगैरे साहेबी विचार त्याच्या मनात आलेही नाहीत.

फेडररच्या गेमची शैली एफर्टलेस म्हणावी अशी आहे. टेनिसचे सगळे शाॅट्स मग तो दणदणीत फोरहँड असो की हळुवार मारलेला ड्राॅपशाॅट असो. सगळं काही एकाच प्रकारे, शांतपणे. आणि हा शांतपणा दाखवतानाही कुठे दिखाऊपणा नाही. पाॅईंट गेला म्हणून मॅकेन्रोपासून गोरान इव्हानेसेविचपर्यंत कोर्टात आदळआपट करणारे कितीतरी खेळाडू टेनिसविश्वाने पाहिले. अगदी मॅचदरम्यान आपल्या सगळ्याच्या सगळ्या रॅकेट्स रागारागात तोडून दिल्याने मॅचमधून हाकलले गेलेलेही अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. पण फेडररचा असा उद्रेक कोणी पाहिला नाहीये.

आंतरराष्ट्रीय पातळीवर येण्याच्या आधी फेडरर हा असा आदळआपट करणारा आणि प्रचंड चिडखोर स्वभावाचा युवा खेळाडू होता. आता यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. त्याने आपल्या या रागावर नियंत्रण मिळवलं आणि मग इतिहास घडला

फेडररची भावनाशीलता आता मॅच जिंकल्यावर दिसते. त्याचा आयकाॅन असलेल्या पीट सँप्रसला हरवत विजेतेपद मिळवल्यावर मॅचनंतर टीव्ही कॅमेऱ्यांसमोर फेडरर रडला होता. त्यानंतर टेनिसविश्वाच्या एकएक पायऱ्या चढत असतानाही त्याने त्याचं सच्चेपण सोडलं नाही.

तो दुसऱ्याची खोटी स्तुती करणार नाही. अंडरडाॅग असण्यापेक्षा मला चॅम्पियन होणं आवडेल, असं म्हणताना राॅजरमधला जिंकायला आणि जिंकायलाच उत्सुक असणारा स्पर्धक दिसतो. पण इतकी वर्ष दुखापतींशी झगडत त्याच्या सिंहासनाला सारखे हादरे देणाऱ्या आणि प्रसंगी त्याला तिथून खाली खेचणाऱ्या राफाएल नडालची खरीखुरी प्रशंसा करताना त्याचातला माणूसही दिसतो.

फेडरर-नडाल युग आता शेवटच्या टप्प्यात आहे असं म्हणतात पण जगभरातल्या लाखो टेनिसचाहत्यांसाठी हा काळ त्यांच्या मनातल्या एका कोपऱ्यात कायम राहणार आहे