सहाव्या विश्वचषकाचे स्वप्न घेऊन उतरलेल्या यजमान ब्राझीलसाठी आता कुठे खरी लढाई सुरू झाली होती. साखळी फेरीत सोपा ड्रॉ, बाद फेरीत चिली आणि त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत कोलंबियासारख्या छोटय़ा संघांचे आव्हान ब्राझीलने लिलया परतवून लावले. शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ब्राझीलने कोलंबियावर २-१ असा सहज विजय मिळवून उपांत्य फेरीत धडक मारली. २००२मध्ये पाचव्यांदा विश्वचषक पटकावल्यानंतर ब्राझीलला पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठता आली. पण उपांत्य फेरीत जर्मनीसारख्या बलाढय़ संघाशी मुकाबला करण्याआधीच ब्राझीलचा नेयमार नावाचा सिंह दुखापतीमुळे धारातीर्थी पडला. त्यामुळे ‘गड आला, पण सिंह गेला,’ अशीच काहीशी अवस्था ब्राझीलची झाली आहे.
कोलंबियाविरुद्धच्या विजयानंतर ब्राझीलवासीयांनी आनंद साजरा करायला सुरुवात केली, पण नेयमारने मणक्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्याची बातमी लोकांपर्यंत पोहोचताच त्यांच्या आनंदावर विरजण पडले. त्यातच सलग दुसऱ्या सामन्यात पिवळे कार्ड मिळाल्यामुळे थिआगो सिल्वाला जर्मनीविरुद्ध खेळता येणार नाही. आता या दोन दिग्गज खेळाडूंविना ब्राझीलला उपांत्य फेरीची लढाई जिंकावी लागणार आहे. त्याआधी थिआगो सिल्वाने सातव्याच मिनिटाला गोल करून ब्राझीलला आघाडी मिळवून दिली होती. ६९व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री-किकवर डेव्हिड लुइझने केलेला गोल डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. या गोलच्या बळावर ब्राझीलने २-० अशी आघाडी घेतली. पण ८०व्या मिनिटाला जेम्स रॉड्रिगेझने गोल करून सामन्यात रंगत आणली. पण स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या कोलंबियाला बरोबरी साधता आली नाही.
सुपरस्टार जेम्स रॉड्रिगेझ
विश्वचषक स्पर्धेत पाच गोल झळकावून ‘गोल्डन बूट’च्या शर्यतीत असणाऱ्या जेम्स रॉड्रिगेझला रोखण्याची रणनीती ब्राझीलने आखली होती. त्यामुळे ब्राझीलसारख्या संघाकडून पहिल्या सत्रात धसमुसळा खेळ पाहायला मिळाला. पण २२ वर्षीय रॉड्रिगेझला रोखण्यात ब्राझीलच्या बचावपटूंनी यश मिळवले. मात्र ब्राझीलच्या गोलक्षेत्रात धडक मारणाऱ्या कार्सोस बाक्काला रोखताना ब्राझीलचा गोलरक्षक ज्युलियो सेसारला रेफ्रींनी पिवळे कार्ड दाखवून कोलंबियाला पेनल्टी-किक बहाल केली. या पेनल्टीवर जेम्स रॉड्रिगेझने गोल करत स्पर्धेतील सहाव्या गोलची नोंद केली. आता ‘गोल्डन बूट’ पुरस्कारासाठी त्याच्यासमोर ४ गोल करणाऱ्या थॉमस म्युलर, लिओनेल मेस्सी आणि नेयमार यांचे आव्हान असेल. संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरल्यामुळे सामना संपल्यानंतर रॉड्रिगेझच्या अश्रूंचा बांध फुटला होता.
लुइझची अप्रतिम ‘किक’
घरच्या चाहत्यांसमोर खेळताना ब्राझीलने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. सातव्या मिनिटाला नेयमारच्या क्रॉसवर थिआगो सिल्वाने ब्राझीलसाठी पहिला गोल केला. त्यानंतर त्याच्यावर बचावाची जबाबदारी सोपवण्यात आली. पण कोलंबियाचा गोलरक्षक डेव्हिड ऑस्पिना चेंडू तटवत असताना तो मध्ये आला. खेळात अडथळा आणल्याप्रकरणी रेफ्रींनी त्याला पिवळे कार्ड दाखवले. स्पर्धेतील दुसरे पिवळे कार्ड मिळाल्यामुळे त्याला जर्मनीविरुद्धच्या पुढील सामन्याला मुकावे लागणार आहे. ६९व्या मिनिटाला ब्राझीलला फ्री-किक मिळाली. त्यावर डेव्हिड लुइझने केलेला गोल अप्रतिम होता. रॉबिन व्हॅन पर्सीने हेडरवर केलेल्या गोलनंतर हा गोल स्पर्धेतील सर्वोत्तम आहे, अशीच चर्चा सुरू होती.