आयपीएलच्या तेराव्या हंगामाची बीसीसीआयच्या गव्हर्निंग काऊन्सिलने रविवारी अधिकृत घोषणा केली. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात ही स्पर्धा युएईमध्ये भरवली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी पीटीआयशी बोलताना १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा खेळवली जाईल असं सांगितलं होतं. परंतू रविवारी झालेल्या बैठकीत स्पर्धेच्या अंतिम सामन्याची तारीख बदलत तो १० नोव्हेंबर म्हणजेच मंगळवारी करण्यात आला आहे.

यानिमीत्ताने आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठा बदल घडला आहे. आतापर्यंत पार पडलेल्या १२ हंगामांचा अंतिम सामना हा शनिवार-रविवार म्हणजेच विक-एंडच्या दिवशी खेळवण्यात आला होता. मात्र पहिल्यांदाच यात बदल घडला असून तेराव्या हंगामाचा सामना हा मंगळवारी खेळवण्यात येणार आहे.

याआधी तेराव्या हंगामाचा अंतिम सामना हा ८ नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार होता. परंतू करोनामुळे तयार करण्यात आलेले नवीन नियम, भारतीय संघाचा आगामी ऑस्ट्रेलिया दौरा आणि दोन सामन्यांमध्ये खेळाडूंना पुरेसा वेळ मिळाला यासाठी स्पर्धेच्या अंतिम सामन्याची तारीख बदलून ८ ऐवजी १० करण्यात आल्याचं कळतंय.