ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेबाबत माजी क्रिकेटपटू गंभीरचे मत

 मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताने स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर यांना घाबरण्याची काहीही आवश्यकता नाही. किंबहुना भारताचे वेगवान त्रिकुट ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर नक्कीच वर्चस्व गाजवतील, अशी प्रतिक्रिया माजी सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केली.

३ डिसेंबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेच्या पार्श्वभूमीवर एका क्रीडा वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान गंभीरने भारताचे पारडे जड असल्याचे सांगितले.

‘‘स्मिथ-वॉर्नर जोडीचे भारताने उगाच अतिरिक्त दडपण घेऊ नये. भारतीय गोलंदाजांची फळी या दोघांसह संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघावर नक्कीच वर्चस्व गाजवतील. परंतु २०१८च्या तुलनेत यावेळी त्यांना अधिक संघर्ष करावा लागेल,’’ असे ३८ वर्षीय गंभीर म्हणाला.

‘‘कसोटी सामना जिंकण्यासाठी तुम्हाला २० बळी घेणे आवश्यक असतात. त्यामुळे भारतीय फलंदाजांनी कितीही मेहनत केली, तरी अखेरीस भारताच्या गोलंदाजांवर सामन्याचे भवितव्य अवलंबून असेल. जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा यांच्या वेगवान त्रिकुटाने गेल्या दोन वर्षांत भारताबरोबरच विदेशी मैदानांवरही सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे यावेळीही ते कामगिरीत सातत्य राखतील, याची मला खात्री आहे,’’ असेही गंभीरने सांगितले.

२०१८-१९च्या दौऱ्यात भारताने कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली कसोटी मालिकेत २-१ असे यश संपादन केले. परंतु त्यावेळी स्मिथ-वॉर्नर यांच्या जोडीला चेंडू फेरफारीच्या शिक्षेमुळे वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले होते.

कोहलीवरील ओझे कमी करावे!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत कर्णधार कोहलीवर अनेक जबाबदाऱ्या असतील, परंतु सहकाऱ्यांनी त्याच्यावरील भार हलका करावा, असे गंभीरने सुचवले. ‘‘निश्चितच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत कोहलीच्या कामगिरीवर भारताचे बरेचसे यश अवलंबून असेल. नेतृत्वाबरोबरच त्याला फलंदाजीतही योगदान देणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियातील चाहते आणि प्रसारमाध्यमांकडूनही त्याच्यावर नेहमीच निशाणा साधला जातो. परंतु संघातील अन्य सहकाऱ्यांनी त्याच्यावरील भार हलका करणे गरजेचे आहे. विशेषत: कसोटी मालिकेत रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांसारख्या अनुभवी खेळाडूंनी अधिक जबाबदारीने खेळ करावा,’’ असेही गंभीरने सांगितले.