भारतीय क्रिकेट संघाचा माजी जलदगती गोलंदाज व्यंकटेश प्रसादने आयसीसीला चांगलेच फटकारले आहे. प्रसादने नो बॉल आणि खेळ भावना याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. हे प्रश्न उपस्थित करताना त्याने गोलंदाजांची बाजू मांडली आहे.

आयपीएलचा बारावा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यातील एका घटनेप्रकरणी फोटो ट्विट करून प्रसादने नाराजी व्यक्त केली. प्रसादने राजस्थानचा गोलंदाज मुस्तफिजुर रहमानचा नो बॉल टाकत असतानाचा फोटो पोस्ट केला. या फोटोत फलंदाजाने आधीच क्रीज सोडली होती.

प्रसाद म्हणाला, ”एक पाऊल पुढे टाकल्याबद्दल नो-बॉल म्हणून गोलंदाजाला शिक्षा दिली जाते. परंतु धाव घेण्याच्या प्रक्रियेत क्रीज आधीच सोडणाऱ्या फलंदाजास कोणतीही शिक्षा नाही. एखाद्या गोलंदाजाला अशा प्रकरणात फलंदाजाला बाद करण्चाचा अधिकार असतो. त्यामुळे या निर्णयावर खेळभावनेला आणणे, हा एक विनोद आहे.”

 

आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेकदा मंकडींगच्या निर्णयावर चर्चा रंगते. अनेकदा या विषयावर खेळभावना म्हणून गोलंदाजाला फटकारले जाते. त्यावर काही खेळाडू नियमांनुसार आपला मुद्दा मांडताना दिसतात, तर काहीजण हा नियम चुकीचा म्हणून अमान्य करतात. व्यंकटेश प्रसादनेही खेळभावनेच्या मुद्द्याला अतिमहत्त्व देणाऱ्यांना फटकारले आहे.