भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला ‘कॅप्टन कूल’ असं म्हटलं जायचं. भारतीय संघाच्या कर्णधारपदी असताना महेंद्रसिंग धोनीने अनेक कठीण प्रसंगी आपला संयम दाखवत विजय मिळवून दिला आहे. धोनीने संयम दाखवत घेतलेले निर्णयही अनेकदा भारतीय संघाच्या फायद्याचे ठरले आहेत. महेंद्रसिंग धोनीनेच टी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात जोगिंदर शर्माला ओव्हर देत ऐतिहासिक विजय मिळवला होता. सोबतच २०११ एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये बॅटिंगसाठी जाण्याचा निर्णय असो अथवा मग आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीत रोहित शर्माला ओपनिंगला पाठवण्याचा निर्णय असो धोनीने नेहमी आपण योग्य निर्णय घेत असल्याचं दाखवून दिलं आहे.

कर्णधारपदी आपला संयम आणि योग्य निर्णय घेत धोनीने आपल्या कार्यकाळात तीन आयसीसी ट्रॉफी मिळवल्या आहेत. आपल्या करिअरमध्ये धोनी इतका संयमी कसा असायचा, त्याचा ताबा कधीच सुटला नसेल का ? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना नेहमी पडतो. भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू इरफान पठाणने स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट कनेक्टेड कार्यक्रमात बोलताना धोनीसंबंधी एक किस्सा सांगितला आहे. २००७ मध्ये सराव करत असताना आऊट झाल्यानंतर धोनी कशा पद्दतीने चिडला होता हे पठाणने सांगितलं आहे.

“ही २००६-०७ मधील गोष्ट आहे. आम्ही एक गेम खेळत होतो ज्यामध्ये उजव्या हाताचे फलंदाज डाव्या हाताने आणि डाव्या हाताचे फलंदाज उजव्या हाताने खेळणार. वॉर्म अप करुन झाल्याने आम्ही सराव करण्यासाठी जात असे. वॉर्म अप करत असताना दोन संघ असायचे. एकदा धोनीला आऊट दिल्यानंतर तो खूप चिडला होता. आपण आऊट नव्हतो असं त्याचं म्हणणं होतं. त्याने आपली बॅट फेकून दिली आणि ड्रेसिंग रुममध्ये निघून गेला. सरावासाठीही तो उशिरा आला. त्यामुळे धोनीला राग येतो हे नक्की आहे,” अशी आठवण इरफान पठाणने सांगितली आहे.

धोनीने आयसीसी व्यतिरिक्त आयपीएलमध्येही चांगली कामगिरी केली आहे. धोनीने तीन वेळा चेन्नई संघाला आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे. धोनी भारतीय संघापासून गेल्या अनेक दिवसांपासून दूर आहे. यावर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये धोनीला खेळताना पाहण्याची संधी होती. मात्र करोनामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलं आहे.