टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी १२७ भारतीय खेळाडू जपानच्या राजधानीत आहेत. भारताची महिला वेटलिफ्टर मिराबाई चानूनेही ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. म्हणजेच ३२व्या ऑलिम्पिकमध्ये भारताला खाते उघडण्यात यश आले आहे. दुसरीकडे, भारताचा शेजारील देशातील पाकिस्तानातून केवळ १० खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले आहेत. यामुळे माजी क्रिकेटर इम्रान नजीरला संताप अनावर झाला आहे.

उद्घाटन सोहळ्यात क्रिकेट संघापेक्षाही कमी संख्या पाहिल्यानंतर इम्रान नजीरला राग आला आहे. ट्विटरवर २०१२ आणि २०२१ असे दोन फोटो शेअर करताना त्याने लिहिले, ”हे खरोखर खेदजनक आहे. २२ कोटी लोकांच्या देशातील केवळ १० खेळाडू. पाकिस्तानच्या या परिस्थितीसाठी क्रीडा क्षेत्रातील जबाबदार असलेल्या प्रत्येकाला लाज वाटली पाहिजे.”

 

हेही वाचा – Tokyo 2020 : पदकाकडं कूच करणाऱ्या मनिका बत्रानं नाकारलं प्रशिक्षकाचं मार्गदर्शन!

ऑलिम्पिक आणि पाकिस्तान

२०१२ मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानच्या २१ खेळाडूंनी भाग घेतला होता. तर १९५६च्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक ६२ खेळाडूंनी पात्रता दर्शविली होती. विशेष म्हणजे ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानकडे फक्त १० पदके आहेत. यात ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ कांस्यपदकांचा समावेश आहे.