श्रीलंकन क्रिकेट संघासाठी २०११ च्या विश्वचषक खेळणारे ऑफ स्पीनर सूरज रणदीव सध्या ऑस्ट्रेलियामध्ये बस चालक म्हणून काम करत आहे. मेलबर्नमधील ट्रान्सडेव कंपनीमध्ये सूरज सध्या बस चालक म्हणून करतोय. सूरजने श्रीलंकन संघाकडून खेळताना १२ कसोटी सामनेही खेळले आहेत. त्याच्या नावावर ४३ विकेट्सही आहेत. एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची आकडेवारी सांगायची झाल्यास सूरजने श्रीलंकेसाठी ३१ एकदिवसीय सामने खेळले असून त्यामध्ये त्याने ३६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचप्रमाणे सर्वात जलद क्रिकेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टी-२० प्रकारातील सात सामन्यांमध्ये सूरज श्रीलंकन संघाचा भाग होता. त्याने या सात सामन्यांमध्ये सात बळी घेतले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा- विराट कोहली मैदानाबाहेरही अव्वल; ठरला जगातील पहिला क्रिकेटर

सूरज रणदीव हा २०१९ पासून ऑस्ट्रेलियात राहत आहे. इथे तो बस चालवण्याबरोबरच एका स्थानिक क्रिकेट क्लबसाठीही खेळतो. त्याने २०१९ मध्ये स्थानिक पातळीवरील आपला शेवटचा सामना खेळला होता. २०१६ मध्ये सूरजने आपल्या देशासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळाला. त्यानंतर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यान ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेदरम्यान सूरज हा मेलबर्न क्रिकेट मैदानामध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा सराव घेणाऱ्या खेळाडूंमध्ये होता.

सूरज रणदीव हा भारतीयांच्याही चांगलाच लक्षात असणारा श्रीलंकन खेळाडू आहे. मात्र यामागे गोड आठवणींऐवजी एक कटू आठवण आहे. २०१० साली दाम्बुलामध्ये ९९ धावांवर खेळणारा भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज विरेंद्र सेहवाग याला शतकापासून रोखण्यासाठी सूरजने मुद्दाम नो बॉल टाकला होता. ९९ धावांवर खेळत असतानाच सेहवागने षटकार लगावला. या षटकारासहीत भारत जिंकला, मात्र नो बॉल असल्याने या धावा सेहवागच्या खात्यात जमा झाल्या नाही आणि तो ९९ धावांवर नाबाद राहिला. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने यासाठी सूरजवर एका सामन्याची बंदी घातली होती. तसेच तिलकरत्ने दिलशानवरही दंडात्मक कारवाई करण्यात आलेली.

सूरज रणदीव हा इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्ससाठीही खेळला आहे. २०११ मध्ये त्याने सीएसकेकडून आठ सामने खेळताना सहा विकेट्स घेतल्या होत्या. याच वर्षी सीएसकेने अजिंक्यपद पटकावलं होतं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former sri lanka cricketer suraj randiv opts bus driving profession in australia to make ends meet scsg
First published on: 02-03-2021 at 13:24 IST