इंग्लड दौऱ्यावर रवाना होण्याआधीच पाक क्रिकेट संघाला एक भला मोठा धक्का बसला. परदेश दौऱ्यावर निघण्याआधी पाक क्रिकेट बोर्डाने सर्व खेळाडूंची चाचणी घेतली होती. त्यात एकूण १० खेळाडूंचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सोमवारी शादाब खान, हैदर अली आणि हारीस रौफ असे तीन खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळले होते, त्यानंतर मंगळवारी आणखी सात खेळाडूंना करोनाची लागण झाल्याचे समजले. महत्त्वाचे म्हणजे यात पाकिस्तानचे अनुभवी खेळाडूदेखील आहेत. याच मुद्द्यावरून भारताचा माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट जाणकार आकाश चोप्रा याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डापुढे प्रश्न उपस्थित केले आहेत.

पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का: १० खेळाडूंना करोनाची लागण

२८ जून रोजी पाकिस्तानी संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार होता. त्याआधी पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या वैद्यकीय पथकाने करोना चाचणी घेतली. त्यातून दहा खेळाडू करोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. सोमवारी शादाब खान, हैदर अली आणि हारीस रौफ या करोनाची लागण झालेल्या तीन खेळाडूंना क्वारंटाइन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पण नंतर एकूण १० खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळले. यात फखर झमान, इमरान खान, काशिफ भट्टी, मोहम्मद हाफिज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान आणि वहाब रियाज या सात जणांचा समावेश आहे. पाकिस्तानचे १० खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आकाश चोप्राने बोर्डाला प्रश्न विचारला.

“पाकिस्तान क्रिकेट संघातील एकूण १० खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ते सर्व खेळाडू लवकरात लवकर तंदुरूस्त होवोत, ही प्रार्थना. पण पाक क्रिकेट बोर्डाला दोन प्रश्न – १. पाक संघाचा इंग्लंड दौरा पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणेच होणार का? आणि २. एवढ्या साऱ्या खेळाडूंना करोनाची लागण कशी काय झाली?”, असे ट्विट आकाश चोप्राने केले.

इंग्लंड दौऱ्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २९ जणांच्या संघाची घोषणा केली होती. ज्यात काही राखीव खेळाडूंना जागा देण्यात आली होती. बिलाल आसिफ, इमरान बट, मुसा खान आणि मोहम्मद नवाझ हे सध्या पाक संघात राखीव खेळाडू म्हणून आहेत. इंग्लंड दौऱ्यात पाकिस्तानी संघ ३ कसोटी आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. या दौऱ्यावर रवाना होण्याआधी स्वतःची करोना चाचणी करून घेणं बंधनकारक करण्यात आलं होतं.