झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून परिचित असलेल्या हीथ स्ट्रिकवर आयसीसीने 8 वर्षांसाठी बंदी घातली आहे. स्ट्रीकने भ्रष्टाचार रोखण्यासाठीच्या नियमांचे उल्लंघन केल्याची कबुली दिली असून आयसीसीने त्याच्यावर ही कारवाई केली आहे. आयसीसीच्या अँटी करप्शन कोडच्या पाच नियमांचे स्ट्रीकने उल्लंघन केले.

 

झिम्बाब्वेच्या महान गोलंदाजांपैकी एक असणारा स्ट्रीक 2017 ते 2018 दरम्यानच्या अनेक सामन्यांमध्ये संशयाच्या भोवऱ्यात होता. प्रशिक्षक म्हणूनही त्याच्यावर अनेक सामन्यांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता. हे सामने आंतरराष्ट्रीय क्रिकेट, आयपीएल, बांगलादेश प्रीमियर लीग आणि अफगाणिस्तान प्रीमियर लीग यांच्याशी निगडित होते. स्ट्रीकनेही या आरोपांविरोधात अपील केले, पण शेवटी त्याने आपली चूक कबूल केली. आता तो 8 वर्ष कोणत्याही क्रिकेट कार्यात भाग घेऊ शकणार नाही.

स्ट्रीकची कारकीर्द

झिम्बाब्वेकडून स्ट्रीकने 65 कसोटी आणि 189 एकदिवसीय सामने खेळले आहेत. गोलंदाज म्हणून त्याने 216 कसोटी आणि 239 एकदिवसीय विकेट्स घेतल्या. इतकेच नव्हे, तर स्ट्रिकने कसोटीत 1990 आणि एकदिवसीय सामन्यात 2942 धावादेखील केल्या. 2005मध्ये तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आणि इंग्लंडमधील वारविक्शायर क्रिकेट क्लबचा कर्णधार झाला. 2016च्या आयपीलमध्ये स्ट्रीक गुजरात लायन्सचा तर, 2018च्या हंगामात तो कोलकाता नाइट रायडर्सचा गोलंदाजी प्रशिक्षक होता.