माजी कर्णधार बायचुंग भुतियाचे मत; एफपीएआय पुरस्कारांचे वितरण
इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) प्रत्येक संघातील भारतीय खेळाडूंची संख्या सहा असावी अशी मागणी भारताचा माजी कर्णधार बायचुंग भुतियाने केली आहे. तसेच आयएसएलमधील संघांची संख्याही वाढवावी, अशी मागणी करणारे पत्र आयएमजी-रिलायन्सला पाठवले आहे, असेही भुतियाने सांगितले. भारतीय फुटबॉलपटू संघटनेच्या (एफपीएआय) वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात तो बोलत होता. २०१६ या वर्षांतील सवरेत्कृष्ट भारतीय खेळाडूचा पुरस्कार मोहन बगान आणि चेन्नईयन एफसीच्या जेजे लाल्पेखलुआला देण्यात आला.
‘आयएसएल आणि आय-लीग या दोन्ही लीगसोबत आम्हाला काम करण्याची इच्छा आहे. या दोन्ही लीगमध्ये अधिकाधिक संघांनी सहभाग घ्यावा आणि या लीगला अधिक बळकटी मिळावी, असे आमचे मत आहे. संघसंख्या वाढल्याने अधिक भारतीय खेळाडूंना संधी मिळेल. आयएसएलमध्ये अंतिम अकरा जणांच्या संघात सहा भारतीय खेळाडूंना संधी मिळावी, या आशयाचे पत्र आम्ही रिलायन्सला पाठवले आहे,’ अशी माहिती भुतियाने दिली. आयएसएलच्या सध्याच्या नियमानुसार एका संघात पाच भारतीय आणि सहा परदेशी खेळाडूंना खेळण्याची मुभा आहे.

या वर्षांचे पुरस्कारार्थी
सर्वोत्तम प्रशिक्षक : अॅश्ली वेस्टवूड; बेंगळुरू एफसी
भारतीय खेळाडू : जेजे लाल्पेखलुआ; चेन्नईयन एफसी/मोहन बगान
युवा खेळाडू : उदांता सिंग; बंगळुरू एफसी
परदेशी खेळाडू : रँटी मार्टिन; ईस्ट बंगाल
चाहत्यांनी निवडलेला खेळाडू : देबजित मजुमदार; मोहन बगाल/ मुंबई सिटी एफसी